मुंबई : रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी इमारतींना मालमत्ता करात पाच टक्के सूट देणाऱ्या योजनेचे गेली पाच वर्षे कागदी घोडेच नाचविण्यात येत आहेत़ राज्य सरकारने निश्चित धोरण व नियमावली तयार न केल्याने या योजनेचे निकष, इमारतींवर देखरेखीसाठी यंत्रणा उभी राहू शकली नाही़ या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू होण्यापूर्वीच पाण्यात जाण्याची चिन्हे आहेत़भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने पालिकेने ३०० चौ़मी़ जागेतील इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सक्तीचा केला़ इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात सूट देण्याची योजना १ एप्रिल २०१० पासून पालिकेने अमलात आणली़ त्यानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग, ओला व सुका कचरा वर्गीकरण, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प, कचऱ्यापासून खतनिर्मिती असे प्रकल्प असलेल्या इमारतींना मालमत्ता करात पाच टक्के सूट मिळणार होती़मात्र राज्य सरकारकडून याबाबत कोणतेच धोरण अथवा नियमावली निश्चित झाली नाही़ त्यामुळे गेली पाच वर्षे या योजनेचा लाभ इमारतींना मिळू शकलेला नाही़ ही योजना सुरू करण्याचा आग्रह शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून होत आहे़ परंतु योग्य धोरणाअभावी ही योजना अमलात आणण्यास तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी शेवाळे यांच्याकडे गेल्या आठवड्यात पत्राद्वारे असमर्थता दर्शविली़ (प्रतिनिधी)
हार्वेस्टिंग प्रोत्साहन योजना रखडली
By admin | Published: May 03, 2015 5:48 AM