तुमच्या मुलाच्या बँक खात्यात सायबर क्राइमचे पैसे तर आले नाहीत?
By जितेंद्र कालेकर | Updated: January 2, 2025 14:46 IST2025-01-02T14:46:17+5:302025-01-02T14:46:41+5:30
ठाण्यातील एका ८५ वर्षीय सदानंद पाध्ये यांना कुरिअरच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याची भीती दोन सायबर भामट्यांनी घालून साडेआठ लाखांची फसवणूक केली होती.

प्रतिकात्मक फोटो
जितेंद्र कालेकर
ठाणे : तुम्ही तुमच्या मुलाला बँक खाते काढून दिले असेल तर त्याच्या खात्यातील पैशांच्या व्यवहारावर तुमचे लक्ष आहे का? तुमचे लक्ष नसेल तर एक दिवस पोलिस तुमच्या घराचा दरवाजा वाजवतील आणि तुमच्या मुलाला सायबर क्राईमकरिता फरफटत घेऊन जातील. कारण ठाण्यात अशाच एका प्रकरणाने पालकांची झाेप उडवली आहे.
ठाण्यातील एका ८५ वर्षीय सदानंद पाध्ये यांना कुरिअरच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याची भीती दोन सायबर भामट्यांनी घालून साडेआठ लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणात दोन सायबर भामट्यांच्या वागळे इस्टेट पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चौकशीत पाध्ये यांच्याकडून वसूल केलेली रक्कम अल्प कमिशनच्या बदल्यात कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांच्या बँक खात्यात जमा केल्याची कबुली या सायबर भामट्यांनी दिली. या भामट्यांनी देशभरातील ६० पेक्षा अधिक लोकांची फसवणूक केली आणि लुटलेली रक्कम कॉलेजकुमारांच्या बँक खात्यात जमा करायला भाग पाडले.
२५ ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये ही रक्कम उकळली. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारी आणि निरीक्षक प्रवीण माने यांच्या पथकाने रौचक श्रीवास्तव आणि संदीप यादव यांना थेट लखनाैमधून अटक केली. फसवणुकीतील रक्कम स्वीकारल्यानंतर हवालामार्गे क्रिप्टो करन्सी खरेदी केल्याचे त्यांनी कबूल केले. लखनौच्या अभिषेककुमार शुक्ला या कॉलेज विद्यार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यातील आठ लाख ६० हजारांची रक्कम या दोघांनी वाटून घेतली. त्यापैकी १ टक्के शुक्लाला दिली.
एकावेळी खाते वापरण्यासाठी एक टक्के कमिशन
श्रीवास्तव आणि यादव हे एकावेळी एखाद्या तरुणाचे बँक खाते वापरण्यासाठी एक टक्के रक्कम कमिशन द्यायचे. गेमिंग फंडाचे हे पैसे येणार असल्याचे खाते वापरणाऱ्याला सांगितले जायचे.
अभिषेकसारख्या ६५ तरुणांचा त्यांनी यासाठी वापर केला. पुढच्या व्यवहारासाठी वेगळे पैसे दिले जायचे. यादव आणि श्रीवास्तव यातील सहा टक्के रक्कम स्वत:कडे ठेवून उर्वरित रक्कम क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतरित करून ती अभिषेक गुप्ता आणि अनषक केसरी यांना द्यायचे.
अशा देशभरातील ५९ लाेकांची त्यांनी आर्थिक फसवणूक केली. अशी फसवणूक करणाऱ्या गुप्ता आणि केसरी या सूत्रधारासह त्यांच्या टोळीचा शोध पोलिस उपनिरीक्षक अतुल जगताप घेत आहेत.