मुंबई/ रत्नागिरी- कोकणातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, किरीट सोमय्या २६ मार्च रोजी कोकणचा दौरा करणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे दापोली, मंडणगडमधील नेते संजय कदम यांनी सोमय्यांनी येऊन दाखवावे असा इशारा दिला आहे.
किरीट सोमय्यांनी दापोलीला येऊन दाखवावं आम्ही त्यांना रोखणार'. हे गुजरात नाही तर कोकण आहे. आम्ही कोकणातील लोक, पर्यटकांच्या साथीनं त्यांना रोखणार. यांच्या राजकारणाचा मोठा फटका आमच्याकडील पर्यटनाला बसत आहे. स्थानिकांनी कर्ज काढत, कोरोनातून सावरत आपला घसरलेला गाडा रूळावर आणण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका संजय कदम यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या या इशाऱ्यानंतर भाजपानेही निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ ट्विटरद्वारे म्हणाल्या की, कोकण महाविकास आघाडीने वसुलीच्या पैशातून विकत घेतला की काय?, आपल्या नेत्यांच्या पापावर पांघरूण घालण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या यांचा दापोली दौरा वादातील ठरण्याची शक्यता आहे. २६ मार्च रोजी होणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून कोकणात वातावरण तापलेय. राज्यात या अगोदर शिवसेना विरुद्ध सोमय्या असा संघर्ष पाहायला मिळत होता.
आता यात राष्ट्रवादीने देखील उडी मारली आहे. किरीट सोमय्या २६ तारेखला शक्तीप्रदर्शन करत दापोलीत मार्च काढणार आहेत. १०० गाड्यांचा ताफा घेऊन दापोली तालुक्यातील मुरुड इथल्या साई रिसॉर्टवर हा मार्च काढण्यात येणार आहे. पालकमंत्री अनिल परब यांचं हे साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे सोमय्या यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता.