- शब्दांकन : दीपक भातुसे
तुरुंगातून सुटल्यावर खा. संजय राऊत यांनी भाजपशी जुळवून घेण्याचे ठरविल्याची चर्चा आहे. - मनीषा कायंदे, प्रवक्त्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेशिवसेना नेते संजय राऊत यांच्यामागे जेव्हा ईडीचा ससेमिरा लागला तेव्हा त्यांनी एकतर शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही. ते त्या कारवाईला सामोरे गेले, ते कोणत्याही दबावाला बळी पडले नाहीत. एक सच्चे शिवसैनिक म्हणून ते मूळ शिवसेनेसोबत राहिले. ते अग्रलेखातून नेहमी सिस्टीमवर बोलत होते, त्यांनी क्वचितच व्यक्तिगत टीका केली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चुकीच्या गोष्टींबद्दल ते बोलत आहेत. नोटबंदी, जीएसटी, देशातील राजकीय परिस्थिती किंवा भाजपचे तोडफोडीचे राजकारण तसेच लोकांना खोटी आश्वासने देऊन जिंकून येणे, यावर संजय राऊत निर्भीडपणे बोलत राहिले. ईडीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यांना जामीन मिळाला असून, जामीन देताना न्यायालयाने आदेशात काय म्हटले आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. बाहेर आल्यानंतर ते काही मुद्द्यांवर बोलले, ते काही कमी नाही. त्यांच्या मुलाखतीत ते कटुता या विषयावर बोलले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांचे निर्भीड बोलणे, कमी होणार नाही. कदाचित फडणवीस यांचे कौतुक केले म्हणून तसे पर्सेप्शन असेल; पण ते करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोलाही लगावला आहे. मुख्यमंत्री नाही, तर सगळा कारभार फडणवीस चालवत आहेत, असे त्यांनी अप्रत्यक्ष म्हटले आहे. संधी मिळताच आणि योग्य वेळी ते बोलतील.
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजपमुळात त्यांनी आक्रमक व्हावे की न व्हावे हा त्यांचा प्रश्न आहे; पण मागील वर्ष, दीड वर्ष ज्या प्रकारची भाषा त्यांनी वापरली, पत्रकार परिषदांमध्ये महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह उद्गार काढले, मला वाटते ही चिंतेची बाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर असणार आहे. एकीकडे महाराष्ट्रातील वातावरण चांगले राहावे अशी अपेक्षा करायची. मात्र, त्याच वेळी संजय राऊत यांच्या या भाषेचे काय करायचे. टीकेला आक्षेप असण्याचे कारण नाही, राजकारणात टीका होतच असते; पण टीकेला खालच्या स्तरावर नेण्याचे काम राऊतांनी केले. अग्रलेख, त्यांची भाषा, ते आक्रमक व्हावे, हा प्रश्न आमच्यासाठी मुद्दाच नाही. प्रश्न असा आहे की त्यांना खरेच टीका करायची की गलिच्छ भाषा वापरत राहायची, एवढाच मुद्दा आहे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा बिघडण्याचे काम कोणी केले असेल तर ते संजय राऊत यांनी केले आहे. ज्या प्रकारची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्यातील महिलांबद्दल वापरली गेली, ती महाराष्ट्राची मान उंचावणारी होती का? भाजप हा लोकांशी जोडलेला पक्ष आहे. कुणाच्या ओरडण्याने भाजपच्या अडचणी वाढत नाहीत. लोकही कंटाळलेले होते. खोटारडेपणा, गलिच्छ भाषा लोकांना कधीच आवडत नाही.