मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने लोकसभेत मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मात्र भूमिका बदलली, महाराष्ट्रातील सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसच्या दबावाला शिवसेना बळी तर पडली नाही ना, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, शिवसेनेची भूमिका संदिग्ध वाटते. हे विधेयक कुठल्याही समाजाच्या विरोधात नसून देशहिताचे आहे हे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे. त्यावर शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले. आता राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.हे विधेयक असो की एनआरसीचा विषय असो. शिवसेना कोणाच्या दबावात येऊन पूर्वीची आपली भूमिका बदलणार नाही, अशी आपली अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले.
अधिवेशन दोन आठवडे घ्या
नागपूरचे अधिवेशन केवळ सहा दिवसांत गुंडाळले जात असल्याची टीका करून फडणवीस म्हणाले, अधिवेशन किमान दोन आठवड्यांचे असावे अशी मागणी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही केली; पण सरकारने ती फेटाळली. औपचारिकता म्हणून हे अधिवेशन घेतले जात आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप अद्याप झाले नाही, विस्ताराचा विषय तर दूरच राहिला. आगामी अधिवेशनात आम्ही कोणाला कोणते प्रश्न विचारायचे, असा सवाल फडणवीस यांनी केला.
शेतकऱ्यांना वाढीव मदत कधी?
अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीपासूनच घेतली होती. त्याची अंमलबजावणी तर दूरच आमच्या सरकारने जाहीर केलेली मदतही अद्याप मिळालेली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. आम्ही सरकारला संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. पुढच्या वर्षी चार कामे कमी करा; पण आधी शेतकºयांना मदत द्या, असे ते म्हणाले.