मुंबई : तब्बल १६ वर्षांनी मुलीच्या पाठीवर मुलगा झाला म्हणून आनंदात असलेल्या कुटुंबाच्या हाती मुलगी सोपविल्याचा प्रकार वाडिया रुग्णालयात उघडकीस आला होता. संबंधित कुटुंबाने याप्रकरणी वाडियाचे डॉक्टर आणि नर्स यांच्याविरोधात भोईवाडा पोलिसांत तक्रार नोंदवली होती. मात्र, आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या गर्भदान पद्धतीने बाळाचा जन्म झाल्याने डीएनए सॅम्पल मिळविणे शक्य नसल्याने पोलिसांकडून या प्रकरणात सी समरी फाइल होणार आहे.
प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेवर आयव्हीएफच्या मदतीने त्यांनी उपचार सुरू होते. ७ जून रोजी रात्री वाडिया रुग्णालयात त्यांची प्रसूती झाली. मात्र, बराच वेळाने मुलीला मातेकडे सोपविण्यात आले. मुलाला जन्म दिला असताना मुलगी हातात दिल्याचा आरोप करत महिलेच्या कुटुंबीयांनी खासगी बाळाची डीएनए चाचणी केली तेव्हा बाळाशी त्यांचे डीएनए सॅम्पल जुळले नाहीत. अखेर, भोईवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
गर्भदान प्रक्रिया काय? या प्रक्रियेत ज्या जोडप्याला भ्रूण प्राप्त होते ते अंडी किंवा शुक्राणू दात्याशी अनुवांशिकरित्या जोडलेले नसतात. ते दत्तक घेतले जातात. या महिलेनेही याच प्रक्रियेद्वारे बाळाला जन्म दिला. त्यामुळे डीएनएचे नमुने जुळले नाहीत. बाळाचा जन्म झाला तेव्हा ‘बच्चा हुआ’ असे तेथील कर्मचाऱ्याने म्हटले. मुलगा झाल्याचे समजून बाळाची अदलाबदल झाल्याचा आरोप केला गेला. प्राथमिक तपासात ठोस पुरावा नसल्याने पोलिसांकडून सी समरी फाइल सादर करण्याचे सुरू आहे.