मुंबई : वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट एसएमएस पाठवून वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट एसएमएसना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट एसएमएस नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. मात्र वीजग्राहकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी या बनावट मेसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे.
महावितरणकडून मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस यांची माहिती पाठविण्यात येते.