Join us  

वरुण सरदेसाईंना 'सरकारी भाचा' म्हणून घोषित केलं आहे का?; मनसेचा राज्य सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 2:19 PM

ही बेशिस्त महाराष्ट्राला परवडणारी आहे का?, असा सवाल मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. 

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री व सरकरामधील इतर जबाबदार मंत्री वारंवार कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नियम पाळण्याबाबत व राजकीय कार्यक्रमात, लग्न समारंभाबाबत गर्दी टाळण्याचे सल्ले देत आहेत. मात्र सरकारमध्ये असणाऱ्या पक्षांचेच नेते कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून शिस्तेची अपेक्षा सरकार कशी करु शकतं?, ही बेशिस्त महाराष्ट्राला परवडणारी आहे का?, असा सवाल मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. 

युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या मेळाव्यात राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. याचपार्श्वभूमीवर अखिल चित्रे यांनी वरुण सरदेसाई यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. युवासेनेचे पदाधिकारी मेळावे घेतले जात आहेत. त्यात शक्ती प्रदर्शनासाठी गर्दी जमवली जात आहे. कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवून वरुण सरदेसाई मेळाव्यांचं बिनदिक्कत आयोजन करत आहे.

समाजमाध्यमांमार्फत त्याचे फोटो व्हायरल केले जात आहे. मात्र तरीदेखील वरुण सरदेसाई यांच्यावर कारवाई का होत नाही?, त्यांना शासकीय पाहुणा (State Guest) या धर्तीवर 'सरकारी भाचा' घोषित केले आहे का?, असा टोला अखिल चित्रे यांनी लगावला आहे. तसेच ८ महत्वाचे सवालही अखिल चित्रे यांनी उपस्थित केले आहेत. असं असेल आणि सरकार ह्या अंतर्गत बेबंदशाहीपुढे हतबल असेल तर आम्ही ह्या मोकाट भाच्यांच्या बेशिस्त वर्तवणुकीविरोधात न्यायालयीन लढाईसाठी सज्ज आहोत, असा इशारा देखील अखिल चित्रे यांनी दिला आहे.

सरकारकडे (गृह विभागाकडे) मोकाट सुटलेल्या सरकारी भाच्याबाबत आमचे महत्त्वाचे ८ सवाल!

  • तिसरी लाट किंवा डेल्टा प्लसची पूर्वकल्पना असतानाही तथाकथित युवानेता वरुण सरदेसाई मेळावे घेऊन महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश देऊ इच्छितो?
  • मराठी सण-समारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर होणारी आंदोलनांवर बंदी 'सरकारी भाचा' कार्यकर्ता मेळावा कसा घेऊ शकतो?
  • सरकारी आदेशांचं उल्लंघन केलं म्हणून वरुण सरदेसाई ह्यांच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये? 
  • जनतेने समाज माध्यमातून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करूनही जर मेळावे होणार असतील तर सरदेसाई ह्यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये?
  • जनता निर्बंध पाळत नाही म्हणून आम्ही कडक लॉकडाऊन लावणार' आणि 'मी जबाबदार' असं म्हणून जनतेवर कोरोना महासाथीचं खापर फोडणारं सरकार 'सरकारी भाच्या'वर इतकं उदार का?
  • कुणी भ्रष्ट किंवा बेशिस्त वागत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीचा तात्काळ बंदोबस्त करत मग अगदी आपल्या नातेसंबंधांतला का असेना... मग वारंवार शिवरायांचं नाव घेणारं हे सरकार 'बेशिस्त भाच्याचा' बंदोबस्त कधी करणार?
  • मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बसणारा हा 'सरकारी भाचा' कोरोना नियमांना किंबहुना सरकारलाच जुमानत नाही का? सरकारला नातेवाईकांमधून कुणी आवाहन देत आहे का? 
  • राजकीय हेव्यादाव्यांसाठीही सरकारी भाच्याकडून आंदोलनं करताना गर्दी जमवली जाते, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या भगिनींना अत्यंत घाणेरड्या आवेशात शिवीगाळ केली जाते. महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तथाकथित युवा नेत्याला विशेष सवलत का?
टॅग्स :वरुण सरदेसाईमनसेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार