हसन मुश्रीफ यांना अटकेपासून संरक्षण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 06:21 AM2023-04-06T06:21:55+5:302023-04-06T06:22:06+5:30
अटकपूर्व जामीन अर्जावर ११ एप्रिलला निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनासंदर्भातील निकालवाचन बुधवारी पूर्ण न झाल्याने विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील निकाल ११ एप्रिलपर्यंत राखून ठेवला. तोपर्यंत मुश्रीफ यांना अटकेपासून देण्यात आलेले संरक्षण न्यायालयाने कायम केले.
कागल येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केल्यानंतर मुश्रीफांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल ५ एप्रिलला देऊ, असे न्यायालयाने २८ मार्च रोजी जाहीर केले होते. मात्र, बुधवारी निकालवाचन पूर्ण न झाल्याने ११ एप्रिलला निकाल देऊ, असे न्यायालयाने सांगितले. मुश्रीफ यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, मुश्रीफ यांचा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या आर्थिक अफरातफर प्रकरणाशी काहीही संबंध नाही.