Join us

शेवटच्या महिन्यात विकासाची घाई

By admin | Published: January 13, 2015 1:29 AM

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असल्याने विकासकामे उरकण्यासाठी मुंबई महापालिकेची तारांबळ उडाली आहे़

मुंबई : आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असल्याने विकासकामे उरकण्यासाठी मुंबई महापालिकेची तारांबळ उडाली आहे़ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गेले वर्ष रेटल्यानंतर तब्बल १८८ कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर घाईघाईने आणण्यात आले आहेत़ मात्र यामध्ये मूळ किमतीपेक्षा कमी खर्चाच्या निविदांमुळे विकासकामांच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे़सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात विकासकामांसाठी ११ हजार ५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली़ मात्र डिसेंबर अखेरीपर्यंत यापैकी जेमतेम २२ टक्केच रक्कम खर्च करण्यात आली होती़ लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितांच्या काळात निम्मे वर्ष गेल्यामुळे ही कामे लांबणीवर पडल्याचा बचाव अधिकारी करीत आहेत़ मात्र ३१ मार्चपर्यंत ७८ टक्के निधी खर्च करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे़ सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पुढच्या महिन्यात सादर होत आहे़ या सन २०१४-२०१५ मधील तरतूद ३१ मार्चपर्यंत खर्च न झाल्यास ही रक्कम वाया जाण्याची भीती आहे़ ३१ मार्चपर्यंत ठेकेदारांचे पेमेंट झाल्यानंतर खर्चाची एकूण रक्कम अधिक असेल, असाही दावा अधिकारी करीत आहेत़ परंतु जानेवारी महिन्यात स्थायी समितीच्या दुसऱ्याच बैठकीत १८८ कोटी रुपयांचे ४० प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत़ (प्रतिनिधी)