Join us  

दिरंगाईची झाली हॅट्ट्रिक

By admin | Published: June 19, 2014 12:56 AM

शाळा सुरू होऊन तीन दिवस झाले़त्यात पावसाळा सुद्धा सुरू झाला आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप शैक्षणिक साहित्य पडलेले नाही

ठाणे : शाळा सुरू होऊन तीन दिवस झाले़त्यात पावसाळा सुद्धा सुरू झाला आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप शैक्षणिक साहित्य पडलेले नाही. लोकसभा निवडणुकीची लागलेली आचारसंहितेमुळे तब्बल ३४ हजार विद्यार्थ्यांच्या हाती यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुद्धा रेनकोट, चपला, बुट, वह्या, दप्तर आदींसह इतर शैक्षणिक साहित्य तीन महिने उशिराने हाती पडणार आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांच्या हाती उशिराने शैक्षणिक साहित्य पडणार आहे.ठाणे महापालिकेच्या ८७ इमारती असून, यामध्ये १२७ शाळा भरतात. या शाळांमध्ये सुमारे ३४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु मागील तीन वर्षे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उशिराने हाती पडत आहे. पावसाळा गेल्यानंतर पावसाळी चपला, बूट आणि रेनकोट हाती पडत असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वखर्चाने मुलांना हे साहित्य खरेदी करून द्यावे लागत आहे. सुरुवातीला शिक्षण मंडळाकडे शैक्षणिक साहित्य खरेदीचे अधिकार होते. परंतु त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या हाती ते वेळत पडत नसल्याने तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी याचे अधिकार समाज विकास विभागाकडे दिले. परंतु समाज विकास विभागाला सुद्धा याचा ताळमेळ बसवता आला नाही. सलग दोन वर्षे या विभागाकडून विद्यार्थ्यांच्या हाती सहा महिने उशिराने साहित्य पडले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यानंतर पुन्हा याचे अधिकार शिक्षण मंडळाला देण्यात आले. दरम्यान, निवडणुका अथवा इतर काही व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक साहित्याच्या निविदा आधीच काढल्या जातील, असेही शिक्षण मंडळाने ठरविले होते. परंतु यंदाच्या वर्षी पुन्हा विद्यार्थ्यांचे हाल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळा सुरू झाल्या, पावसाने सुद्धा दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असताना शिक्षण विभागाकडून अद्यापही साहित्य खरेदीच्या निविदा अंतिम झालेल्या नाहीत. येत्या दोन दिवसांत निविदा अंतिम होतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिली. त्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)