मुंबई : पोलिसांना माहिती दिल्याच्या रागातून एका तरुणाचे वाढदिवशीच अपहरण केले. त्यानंतर त्याला रिक्षामध्ये जबरदस्तीने बसवून चालत्या रिक्षात त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घाटकोपर पूर्वेकडील परिसरात इरफान रखमुद्दिन शेख (१८) आई, वडील आणि भावंडासोबत राहतो. शनिवारी त्याच्या वाढदिवसानिमित्त घरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडे अकरा वाजता बर्थडे सेलिब्रेशन संपल्यानंतर शेख हा मावस भावासोबत घराकडे निघाला. त्याच दरम्यान परिसरात राहणारे अमोल आवटे व मंगेश जाधव हे रिक्षा घेऊन त्याच्यासमोर धडकले.पोलिसांना माहिती देतो, असे बोलत त्याला जबरदस्तीने रिक्षात बसविले. पुढे चालत्या रिक्षात त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तेथून एका बांधकाम साईटवर नेले. तेथेही लाकडी बांबूने मारहाण केली. पुढे दिवा येथील मित्राच्या घरी नेले. तेथेही त्याला मारहाण केली. मात्र तेथील मित्राने दोघांना अडविले आणि शेखला झालेल्या मारहाणीबाबत त्याच्या कुटुंबीयांनाकळविले.त्यानंतर शेखला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेख शुद्धीवर आल्यानंतर त्याचा जबाब नोंदविण्यात आला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून वरील घटनाक्रम उघडकीस आला.
वाढदिवशीच अपहरण करून चालत्या रिक्षात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 2:22 AM