हाथरस (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीत सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेचा देशभरातून निषेध होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याचदरम्यान हाथरस प्रकरणाचा भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी निषेध करत योगी सरकारवर टीका केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी राम मंदिर हे बनलं पाहिजे. तसेच आम्ही देखील श्रीरामाचे भक्त आहोत. मात्र क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है, असा संतप्त सवाल तृप्ती देसाई यांनी योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे. तसेच योगी आदित्यनाथजी जेव्हा तुम्ही महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप मोठा आनंद होईल, असं मत देखील तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर व्हिडिओ प्रसिद्ध करत मांडले आहे. योगी आदित्यनाथ हे पालघर येथे साधूंची हत्या झाल्यावर पुढाकार घेतात. पण उत्तर प्रदेशच्या मुलींच्या सुरक्षेविषयी काय, असा सवालही तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.
हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषींना वाचवले जाणार नाही- योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषींना वाचवले जाणार नाही. घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे, हे पथक पुढील 7 दिवसांत अहवाल सादर करेल. वेगवान न्याय मिळावा यासाठी या खटल्याची सुनावणी फास्ट- ट्रॅक न्यायालयात करणार असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.
दोषींवर कठोर कारवाई करा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला. नरेंद्र मोदींनी या घटनेसंदर्भात माहिती जाणून घेतली. यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची सूचना नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
दरम्यान, हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्, प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती.