उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत. तिथे लोकशाहीचा खून होत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित समाजाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार होतो. ती मुलगी आठ दहा दिवस तळमळत रहाते. तिचे शव रात्रीच्या अंधारात कुटुंबीयांना अंधारात ठेऊन गुपचुप जाळले जाते. याला अंत्यसंस्कार म्हणता येणार नाही. याचा लोकशाही मार्गाने जाब विचारायला गेलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाला, प्रियंका आणि राहुल गांधी यांना पोलिसांकडून अडवले जाते. त्यामुळे आता ते घटनास्थळी पायी निघाले असताना त्यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईवर महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये गुंडा राज आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. अत्याचार झाल्यावर तिथे कोणी विचारणा करण्यासाठी गेलं तर आडकाठी केली जाते. दिवसाढवळ्या लोकशाहीचा मुडदा पाडला जात आहे. हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि कुठंतरी बदललं पाहिजे. त्या मुलीवर जीवंतपणी पण अत्याचार झाला आणि मृत्यूनंतर ही तिच्या परिवाराला अत्याचाराला सामोरे जाव लागत आहे. हे सारे मानवतेच्या नियमांमध्ये कुठेच बसताना दिसत नाही.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले होते. मात्र यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींनापोलिसांनी अडवलं. यामुळे पायी प्रवास करत ते हाथरसकडे रवाना झाले. त्यानंतर आता राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.