Hatkanangale Lok Sabha Election : महायुतीने अजूनही हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला गेली आहे, या जागेवर आता धैर्यशील माने खासदार आहेत. येत्या दोन दिवसात ही जागा जाहीर होऊ शकते असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी या जागेची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, त्यामुळे आता हातकणंगलेचा महायुतीमध्ये तिढा वाढणार अशी चर्चा सुरू आहे.
आज माध्यमांसोबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, रयत क्रांती संघटना २०१४ पासून भाजपासोबत आहे. आम्ही २०१९ ला हातकणंगलेकडे मागणी केली होती. त्यावेळी ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यावेळी आम्ही तिथे प्रामाणिक काम केले. सध्या त्या मतदारसंघात आम्ही शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे, तो मतदारसंघ चळवळीचा आहे, यासाठी आम्ही या मतदारसंघाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हीच मागणी त्यांच्याकडे करणार आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
'मला शेतकऱ्यांच्या कामसाठी लढायचं आहे'
सदाभाऊ खोत म्हणाले, मला कोणाचाही पराभव करणाऱ्यासाठी लढायचं नाही. मला शेतकऱ्यांच्या कामसाठी लढायचं आहे. १० वर्षे ते खासदार होते तेव्हा ते शेतकऱ्यांसाठी सभागृहात बोलू शकले नाहीत, तिथल्या शेतकऱ्यांना बदल हवा आहे त्यामुळे राजू शेट्टी यांचं आव्हान माझ्यासाठी क्षुल्लक आहे, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला. मी राजकारणात अपघाताने आलो आहे, माझा सन्मान देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केला आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.