मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोदी सरकार 2 ने धडाकेबाज निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलीय. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीरमधील आर्टीकल 370 हटवून केंद्र सरकारने आपलं काम दाखवून दिलंय. मोदींच्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक झाले, तर काहींनी टीकाही केली. पहिल्या पाच वर्षात मोदींनी नोटबंदी, जीएसटी आणि सर्जिकल स्ट्राईकसारखे धाडसी निर्णय घेऊन दुसऱ्यांदा सत्ता काबिज केली. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनाही मोदींच्या कार्याची, नेतृत्वाची भुरळ पडली आहे.
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड 2019 सोहळ्यात अभिनेता स्वप्नील जोशीने हजेरी लावली होती. त्यामध्ये स्वप्नीलला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये, तुला जर कुणाकडून काही घ्यायचे असेल किंवा काही द्यायचे असेल तर तु कुणाकडून काय घेशील आणि कुणाला काय देशील? असा प्रश्न स्वप्नील जोशीला विचारण्यात आला होता. त्यामध्ये स्वप्नीलला, विराट कोहली, सनी लिओनी, नरेंद्र मोदी आणि केआरके हे चार पर्यायही देण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना मोदींच्या कामाचं कौतुक स्वप्नीलने केलं आहे.
पहिल्यांदा तर मी विराट कोहलीकडून ते घेईल, विराटला म्हणेन मला हे शिकव, असे म्हणत विराटने वेस्टइंडिज दौऱ्यात केलेल्या अॅक्शनची स्टाईल स्वप्नीलने करून दाखवली. त्यानंतर, मोदींच्या कामाचं कौतुक स्वप्नीलने केलं. मोदी सर खूप कठीण काम करत आहेत. खूप मोठी जबाबदारी असून एवढ्या प्रेशरमध्ये जगणं, राहणं फार मोठी गोष्टय. हॅट्स ऑफ हीम... ज्या पद्धतीने ते करतायेत. ही इज द स्ट्राँगेस्ट लिडर इन द वर्ल्ड राईट नाऊ, असे म्हणत स्वप्नीलने मोदींचे कौतुक केलंय. अर्थात, स्वप्नीलला विचारण्यात आलेला प्रश्न कुठल्याही राजकीय हेतुने नव्हता. मात्र, स्वप्नीलने मोदींच्या कामाने प्रभावित होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्येही मोदी सरकारकडून धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत. आर्टीकल 370 नंतर नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत संमत करण्यात आलं आहे. देशात अनेक ठिकाणी मोदी सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदवला जात आहे, हिंसक आंदोलनंही सुरू आहेत. अर्थात, या कायद्याचं समर्थन करणाराही मोठा वर्ग आहे.