हवालदाराला हवेय सपत्निक इच्छामरण; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:16 AM2018-06-06T01:16:59+5:302018-06-06T01:16:59+5:30
मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेल्या पोलीस हवालदार सुनील टोके यांनी सपत्नीक इच्छा मरणाची मागणी केली आहे.
मुंबई : मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेल्या पोलीस हवालदार सुनील टोके यांनी सपत्नीक इच्छा मरणाची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मानसिक छळ होत असून आयुक्त व राज्य सरकारकडूनही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने आपल्याला जगण्याची इच्छा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राष्टÑपती व राज्यपालांना पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली असून त्यांच्या या पत्राने खात्यात खळबळ उडाली आहे.
सशस्त्र दलातील तत्कालिन अप्पर आयुक्त आस्वती दोरजे, वरळी मुख्यालयातील वरिष्ठ निरीक्षक प्रफुल्ल फडके व अन्य अधिकारी संगनमताने छळ करीत असल्याचा आरोप हवालदार टोके यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी ट्रफिक विभागात कार्यरत असताना टोके यांनी विभागातील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराबाबत वरिष्ठांना पुराव्यानिशी निवेदन देवून चौकशीची मागणी केली होती. मात्र त्याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याबाबत न्यायालयाने जनहित याचिका दाखल करुन सखोल चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकाराने पोलीस दल तसेच गृह खात्याची बदनामी झाली, असा समज करुन टोके यांची ट्रॅफिक येथून प्रशासकी कारण दाखवून मुदतीपूर्वीच तडकाफडकी ‘एलए’ला बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांना विविध प्रकारच्या चौकशी, वेतन वेळेवर न काढणे, आजारी रजेबाबत आक्षेप घेत मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप टोके यांनी निवेदनात केला आहे. संगनमत करुन मला व पत्नीला दिल्या जाणाºया त्रासाबाबत त्यांनी आयुक्त दत्ता पडसलगीकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र काहीच कार्यवाही होत नसून उलट त्यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ अधिकारी त्रास देत आहेत, त्यामुळे आपल्याला जगण्याची इच्छा नसून दोघांना इच्छा मरण द्यावे, असे राज्यपाल, राष्टÑपती यांना २५ मे रोजी पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकाºयांकडून मौन
हवालदार टोके यांनी केलेले आरोप व इच्छा मरणाबाबतच्या निवेदनाबद्दल पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर व ‘एलए’च्या तत्कालिन अप्पर आयुक्त अस्वती दोरजे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.