मुंबई : ट्रॅफिक पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अहमद अली मोहम्मद अली कुरेशी याला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सत्र न्यायालयाने शनिवारी सुनावली. चार वर्षे सतत पाठपुरावा करीत शुक्रवारी त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेल्या तपास अधिकाऱ्यांचीही पाठ न्यायालयाने थोपटत त्यांचे कौतुक केले.सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी कुरेशी याला शिक्षा सुनावली. कुरेशी याला मरेपर्यंत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला एक वर्ष सश्रम कारावास भोगावा लागेल. त्याने दंडाची रक्कम भरल्यास त्यातील ४५ हजार रुपये शिंदे यांच्या पत्नी साधना यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. खार पोलीस ठाण्यातील तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या तपासाचे न्यायालयाने यावेळी कौतुक केले. या खटल्यामध्ये तपास अधिकारी काणे यांच्यासह कोर्ट कारकून विद्या कन्हयाळकर, हेमंत कांबळे, गणेश अहिर, राहुल पवार व विशेष सरकारी वकील वैभव बागडे यांनी विशेष प्रयत्न करून शिंदे यांना न्याय मिळवून दिला.खार पश्चिम येथील मॅक्लॉइड पेट्रोल पंप, एस. व्ही. रोड परिसरात २३ आॅगस्ट, २०१६ रोजी कुरेशी आणि त्याच्या लहान भावाने कर्तव्यावर असलेल्या शिंदे यांना बेदम मारहाण केली होती. यात गंभीररीत्या जखमी झालेल्या शिंदे यांचा ३१ आॅगस्ट, २०१६ रोजी मृत्यू झाला.
हवालदार विलास शिंदे हत्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप, ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 2:01 AM