‘औषधासह सकारात्मक दृष्टिकोन ठेवा’

By admin | Published: February 22, 2016 02:25 AM2016-02-22T02:25:52+5:302016-02-22T02:25:52+5:30

एका व्यक्तीची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशी एकूण चार व्यक्तिमत्त्वे असतात. त्यामुळे फक्त शारीरिक आणि बौद्धिक पातळीवर विचार करून चालत नाही. मानसिक

'Have a Positive Attitude With Medicine' | ‘औषधासह सकारात्मक दृष्टिकोन ठेवा’

‘औषधासह सकारात्मक दृष्टिकोन ठेवा’

Next

मुंबई : एका व्यक्तीची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशी एकूण चार व्यक्तिमत्त्वे असतात. त्यामुळे फक्त शारीरिक आणि बौद्धिक पातळीवर विचार करून चालत नाही. मानसिक क्षमता आणि अध्यात्माची सांगड घातल्यास एक संपूर्ण दृष्टिकोन (होलिस्टिक अपरोच) मिळतो. ‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ग्रस्तांनी (एएस) असा संपूर्ण विचार केल्यास त्यांना आजारामुळे होणारे दुखणे कमी होण्यास आणि आजारासह सामान्य आयुष्य जगण्यास मदत होऊ शकते. औषध घ्या, व्यायाम करा आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, असा संदेश जगदीश ब्रामटा यांनी दिला.
रविवार, २१ फेब्रुवारीला ‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ग्रस्तांसाठी गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये ‘होलिस्टिक अपरोच टू अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ या विषयावर एक दिवसीय शिबिर पार पडले. राज्यासह देशातून ‘एएस’ग्रस्त या शिबिराला उपस्थित होते. जगदीश ब्रामटा यांच्याबरोबरच डॉ. एस. एम. अकेरकर, अनिल रावल, दिलीप पारेख, वसंत शेट्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हे शिबिर भरवण्यासाठी प्रदीप बंका, प्रीती करवा यांनी विशेष मदत केल्याचे जगदीश ब्रामटा यांनी सांगितले.
शरीराला महत्त्व आहे कारण त्यात आत्मा आहे. त्यामुळे शरीर ही तुमची ओळख आहे, यात अडकून राहू नका. आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घ्यायला हवी. आजकाल बहुतांश जण तणावाखाली असतात. त्यांना शारीरिक दुखणे असते. पण, यासाठी काम करणाऱ्या संस्था नाहीत, असे का, याचा विचार व्हायला हवा. ‘एएस’विषयी जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे जगदीश ब्रामटा यांनी स्पष्ट केले.
‘एएस’ पूर्ण बरा करण्यासाठी आधुनिक औषधशास्त्रामध्ये औषध नाही. औषधामुळे दुखणे काही काळासाठी कमी होते. पण, औषधाबरोबरच योग्य तो व्यायाम, योगा केल्यास या आजारासह जगता येणे सहज शक्य आहे. या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करताना ब्रामटा यांनी अनेक दाखले उपस्थितांना दिले. ‘एएस’ सुसह्य करण्यासाठी काय उपाय आहेत, तुमची जीवनशैली कशी हवी, व्यायाम, योगाचा कसा उपयोग करता येईल, याचे प्रात्यक्षिक ब्रामटा यांनी करून दाखविले. शिबिरात पौष्टिक
सकस आहाराचे महत्त्व समजावून सांगताना, उपस्थितांना एक-एक पदार्थ खाण्यासही देण्यात
आला. (प्रतिनिधी)

असा सुसह्य होऊ शकतो ‘एएस’
वयाच्या १२व्या वर्षी मला पहिल्यांदा ‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ असल्याचे निदान झाले. मला हिप आणि कण्याला त्रास होता. औषधे सुरू होती. पण चार वर्षे मला खूप त्रास झाला. २००९मध्ये मी योगा करायला सुरुवात केली. माझ्या दुखण्यात खूप फरक पडला. मी सध्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रॅक्टिस करीत आहे, असे एएसग्रस्त असलेल्या मनीष संघई याने सांगितले.
यावर उपचार म्हणजे पेनकिलर आणि अन्य औषधे डॉक्टर देतात. इंजेक्शन घ्यायची म्हटले तर दरवर्षी सुमारे ४ लाख रुपये खर्च येतो. सामान्यांना हे परवडणारे नाही. पण, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. त्याचे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करण्यापेक्षा गोळ्या न घेतल्याने येणारे अपंगत्व लक्षात घेतले पाहिजे.
या आजारात डॉक्टरकडे जाऊन फॉलोअप घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीने स्वत: ठरवले पाहिजे. व्यक्तीने व्यायाम केल्यास त्याच्या प्रकृतीत नक्कीच फरक पडतो. गेल्या सहा वर्षांत मी औषध घेतलेले नाही. पण, नित्य नियमाने मी व्यायाम, योगा करतो. पौष्टिक आहार घेता. मी आता सामान्यपणे सर्व कामे करतो. या आजाराला घाबरून जाऊ नका. निश्चय करा आणि आचरणात आणा, त्यामुळे हा आजार सुसह्य होतो, असे मनीष याने सांगितले.

Web Title: 'Have a Positive Attitude With Medicine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.