तुम्हालाही सिमकार्ड बंद होण्याचा कॉल आला आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:08 AM2021-07-07T04:08:01+5:302021-07-07T04:08:01+5:30
मुंबई : कोरोनामुळे आधीच बेरोजगारी ओढावली असताना सायबर ठगांच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे नागरिकांना जमापुंजी गमाविण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. अशातच ...
मुंबई : कोरोनामुळे आधीच बेरोजगारी ओढावली असताना सायबर ठगांच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे नागरिकांना जमापुंजी गमाविण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. अशातच कागदपत्रे अपुरे आहेत, कार्ड जुने झाले आहे अशी वेगवेगळी कारणे पुढे, करत सिमकार्ड बंद करण्याची भीती घालून ठगीचा धंदा जोर धरताना दिसत आहे. मुंबईत नुकतेच एका वयोवृद्ध डॉक्टरला सिमकार्डसाठी दहा लाख गमाविण्याची घटना ताजी असतानाच खारमधील ७६ वर्षीय आजोबांना पावणे तीन लाखांना फटका बसला आहे.
वांद्रे परिसरात राहणारे ७६ वर्षीय मोहनबीर चंदेलसिंग यांना २४ जानेवारी रोजी व्होडाफोनमधून बोलत असल्याचे सांगून सीमकार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. मोबाइल क्रमांक सुरू ठेवण्यासाठी मोबाइल पाठविलेल्या लिंकमध्ये माहिती भरण्यास सांगितले. तसेच गुगल पेबाबतही विचारणा केली. त्यांनी गुगल पे नसून नेटबँकिंग असल्याचे सांगताच, ठगाने त्यांना दहा रुपये ऑनलाइन व्यवहार करण्यास सांगितला. तसेच ते पैसे पुन्हा मिळणार असल्याचे सांगताच, त्यांनी विश्वास ठेवून पैसे पाठविले. त्यातच काही मिनिटात त्यांच्या खात्यातून २ लाख ८५ हजार रुपये काढल्याचा संदेश मोबाइलवर धडकला. तब्येत ठीक नसल्याने त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहता आले नाही. अखेर, नुकताच पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
यापूर्वीच्या घटना
तासाभरात दहा लाख गमावले
२५ जून : सिमकार्ड ब्लॉक करण्याच्या नावाखाली दादरमधील ६४ वर्षीय डॉक्टरच्या खात्यातून अवघ्या तासाभरात दहा लाख २२ हजार रुपये काढल्याची घटना २५ जून रोजी घडली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
वृद्ध व्यावसायिकाच्या बँक खात्यावर डल्ला
१४ जून : सीमकार्ड बंद होणार असल्याची भीती घालत सीमकार्ड लाइफटाइम सुरू ठेवण्याच्या बहाण्याने ठगाने एका वृद्ध व्यावसायिकाच्या बँक खात्यातील लाखो रुपयांवर हात साफ केल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांनी काय करावे?
कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून गोपनीय माहिती शेअर करू नका. तसेच येणाऱ्या कॉल आहे. संदेशाबाबत अधिकृत ठिकाणी जाऊन खातरजमा करणे गरजेचे आहे. तसेच कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लीक करू नका. कुठल्याही कॉलबाबत संशय येताच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
वृद्ध होताहेत सॉफ्ट टार्गेट
यात ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरत आहे. त्यामुळे त्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सायबर फसवणुकीच्या घटना
यावर्षीच्या गेल्या पाच महिन्यांत, बनावट सोशल मीडिया अकाउंट, मॉर्फिंग तसेची मेल, सायबर फसवणुकीबाबत १९ गुन्हे मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले आहेत. त्यापैकी चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच गेल्यावर्षी याच पाच महिन्यांत १३ गुन्ह्यांची नोंद होती.