लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने शहर उपनगरातील कोविड वाॅर रूम पुन्हा एकदा सक्रिय केल्या आहेत. मात्र या कोविड वाॅर रूम आता मुंबईकरांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाची जबाबदारी घेणार आहेत. मुंबईत अजूनही अनेक लाभार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतली नाही, तर अनेक जण बूस्टर मात्रेपासूनही वंचित आहेत. आता याचाच पाठपुरावा कोविड वाॅर रूमकडून करण्यात येणार आहे.
मुंबईकरांनी लसीकरण पूर्ण केले की नाही, याचे काम देण्यात आले आहे. राज्याच्या कोविड टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी कोविड संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे, वाॅर रूममधून आता काॅल करून लस घेतली की नाही, याची विचारणा केली जाणार आहे.
याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले की, कोविड वाॅर रूममधील अधिकाऱ्यांना कोविड संशयित रुग्णांची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे, ज्यांनी लसीची मात्रा चुकविली आहे त्यांच्याशी संपर्क करून लस घेण्यास सांगितले जाईल. याखेरीस, भविष्यात कोविड संसर्ग वाढल्यास पूर्वीप्रमाणे संपूर्णतः कोविड व्यवस्थापनासाठी या कोविड वाॅर रूम काम पाहतील.