Join us

गिरणी कामगारांना त्रास द्यायचे ठरविले आहे का? पात्रता निश्चिती प्रक्रियेबाबत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 11:20 AM

सध्याच्या प्रक्रियेत अनंत अडचणी येत असल्याने गावाकडून मुंबईत आलेला गिरणी कामगार पिचत असल्याचे चित्र आहे.

मुंबई : म्हाडाकडून एक लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीचे काम सुरू झाले असले तरी घरांची लॉटरी काढण्यापूर्वीच्या प्रक्रियेबाबत गिरणी कामगार नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वीप्रमाणे लॉटरी काढल्यानंतर पात्रता निश्चित करण्यावर गिरणी कामगार संघटनांनी जोर दिला असून, सध्याच्या प्रक्रियेत अनंत अडचणी येत असल्याने गावाकडून मुंबईत आलेला गिरणी कामगार पिचत असल्याचे चित्र आहे.

गिरणी कामगाराला घराची लॉटरी लागल्यानंतर त्याने कागदपत्रे सादर करायची; आणि मग त्याची पात्रता निश्चित करायची ही पद्धत योग्य होती. आता मात्र अगोदरच पात्रता निश्चित केली जात आहे. ही त्रासदायक प्रक्रिया असून  गिरणी कामगार हा सातारा, कोल्हापूर, कोकणासह उर्वरित मुंबईत येऊन दिवसभर रांगेत उभा राहतो आहे. हजार ते बाराशे गिरणी कामगार रांगेत उभे राहतात व संध्याकाळी पाच वाजले की म्हाडा म्हणते आता उद्या या, यामुळे गिरणी कामगारांची मोठी ससेहोलपट होत आहे.

या कामासाठी मुंबईत आलेला कामगार किती काळ वाट पाहणार? गिरणी कामगारांची फसवणूक होत असून, हे करण्यामागे नेमका काय हेतू आहे? हे कळण्यास मार्ग नाही. अगोदर पात्रता निश्चित करून जेवढे गिरणी कामगार पात्र होतील; तेवढ्या गिरणी कामगारांना शासन घरे देणार आहे का? म्हाडाने सुरू केलेल्या या प्रक्रियेमुळे गिरणी कामगारांना नाहक त्रास होतो आहे, असे म्हणणे गिरणी कामगार नेत्यांनी मांडले आहे.

  पात्र निश्चितीसाठी तीन महिन्यांचा अवधी दिला असला तरी ही प्रक्रिया तीन महिन्यांत होणारी नाही.

  कारण दीड लाख गिरणी कामगार असून आता चार ते पाच हजार गिरणी कामगारांचे काम झाले असेल.

  या कामामुळे गिरणी कामगारांना घरे देण्याचे कामही ठप्प झाले आहे. कारण तो कर्मचारी याकामी गुंतला आहे.

   एकंदर नुकसान गिरणी कामगारांचे होते आहे.

गिरणी कामगारांसाठीची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी हे काम नीट होत नाही. गिरणी कामगार वयोवृद्ध आहे. त्याकडे स्मार्टफोन नाही. मुलाकडे स्मार्ट फोन असला तरी मुलगा पूर्ण वेळ उपलब्ध असेल, असेही नाही. गिरणी कामगाराला यातले काही कळत नाही. सायबर कॅफेमध्ये जावे लागते. संकेतस्थळ बंद असते. अशा अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे लॉटरीनंतर पात्रता निश्चिती योग्य आहे.

- प्रवीण घाग, गिरणी कामगार नेते