मुंबई - राज्यातील तलाठी पदाच्या ४६४४ पदांसाठी निघालेल्या भरतीप्रक्रियेचं वेळापत्रक आता जाहीर झालं आहे. या भरतीसाठी तब्बल साडे अकरा लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या भरतीचा मुद्दा यंदाच्या पावसाळी अधिवेशनातही चांगलाच गाजला होता. आमदार रोहित पवार यांनी भरती प्रक्रियेच्या वाढीव फीवरुन राज्य सरकारला सवाल केले होते. त्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. मात्र, प्रश्न आजही कायम आहे. दरम्यान, आता तलाठी भरतीसाठीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.
भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) च्या ४६४४ पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला याच महिन्यात सुरुवात होणार आहे. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत म्हणजेच महिनाभर विविध टप्प्यात ही परीक्षा होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येईल. टीसीएस कंपनीच्यामार्फत ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे.
तलाठी पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. एकूण तीन सत्रांत ही परीक्षा होणार आहे. सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र केवळ तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहे. दरम्यान, तलाठी पदासाठी २०० गुणांची परीक्षा संगणकावर घेण्यात येत आहे. गुणवत्ता यादीत समावेश होण्यासाठी या परीक्षेत एकूण गुणांच्या ४५ टक्के मार्क्स मिळणे अनिवार्य आहे.
परीक्षेची तारीख अन् टप्पे
पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.