मुंबई - भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावरुन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्या गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडे समर्थक कार्यर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं असून माध्यम प्रतिनिधींना दिलखुलासपणे उत्तरे दिली.
पंकजा मुंडेंच्या वेट अँड वॉच भूमिकेमुळे राज्यातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात संघर्षयात्रा काढली. राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले होते. राष्ट्रवादीचा हा पाठिंबा घेताना, पंकजा मुंडेंना अंधारात ठेवलं होतं का? असा प्रश्न पंकजा यांना विचारण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना, त्या निर्णयाचा मी भाग नव्हते, मला अंधारात ठेवलं असं मी म्हणणार नाही. पण, मी त्या निर्णयाचा भाग नव्हते. कारण, प्रत्येक निर्णयामध्ये पक्षाचे छोटे-छोटे ग्रुप्स काम करत असतात. एक-दोघं तीघं असे असतात. मी त्या निर्णयासंदर्भातील ग्रुपचा भाग नव्हते, असे म्हणत पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आपल्याला कल्पना नव्हती, असे सांगितले. त्यादिवशी मी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही केलं होतं. महाराष्ट्राला स्थीर सरकारची गरज आहे, असे म्हटलं होतं. मात्र, 24 तासात चित्र पलटंल, असेही पंकजा यांनी म्हटले. दरम्यान, याच प्रश्नावर खासदार प्रितम मुंडेंनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतील काही निर्णय, बातम्या बाहेर लीक करता येत नाहीत, असे प्रितम म्हटलं होते.
तसेच, जर आम्ही राष्ट्रवादीसोबत जात असू, तर त्या तिघांची महाआघाडी चुकीची आहे, असे म्हणणं योग्य नाही. ते तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असतील तर ते अयोग्य असं मला वाटत नाही, असे म्हणत पंकजा मुंडेंनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेचं समर्थन केलं आहे. दरम्यान, मला कशाची अपेक्षा किंवा कशाचीच भिती नसल्याने उद्या मनमोकळेपणे बोलेन, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.