लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तुम्हीही गाडीची चावी न काढता निघालात का?, तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण तुमच्या विसरभोळेपणाचा फायदा उचलत मालेगावची दुकली थेट दुचाकी घेवून धूम स्टाईलने पसार होत असल्याचे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस (एमआरए) पोलिसांच्या कारवाईतून समोर आली आहे. तपास पथकाने पाच दिवस हॉकर्स बनून दुकलीला बेड्या ठोकल्या आहे. या टोळीविरुद्ध मुंबई, ठाणे आणि कल्याण भागात १४ गुन्हे नोंद असून, ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
अयाजअली रहमत अली अन्सारी (३८), अब्दुल माजिद मो. साबिर अन्सारी (३६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास मुसाफिरखाना परिसरातून दुचाकी चोरी केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेजवरून आरोपींची फोटो मिळाले. जवळपास शोध घेतला असता मुंबईतही या दुकलीने दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने दोघांचे मालेगाव कनेक्शन उघडकीस आले. त्यानुसार, पोलिसांनी हॉकर्स बनून पाच दिवस पाळत ठेवली.
अखेर, दोघे जाळ्यात अडकताच त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून मुंबई, ठाणे, कल्याण येथील १४ गुन्हयाची उकल करण्यात आली. चोरी झालेल्या एकूण ८ दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या दुचाकी एम. आर. ए. मार्गसह, माहिम, जे.जे., सायन, डोंगरी, कोपरी, ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक प्रताप लामतुरे, सपोउनि आयरे आणि अंमलदार वनगे, चव्हाण, मोरे, सावंत या पथकाने ही कारवाई केली आहे.
अशी करायचे चोरी...
मुंबई, ठाण्यात फेरफटका मारायचा. चावी विसरलेली वाहने शोधायचे. संधी साधून वाहनांसहीत पसार व्हायचे. अशाच पद्धतीन या दुकलीने आतापर्यंत अनेक वाहने पळविल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करत आहे.