मुंबई - आज माझ्या अंदाजाने काँग्रेस आणि आम्ही सोडले तर उरलेल्या २ पक्षांना टिकायचे राजकारण करायचे आहे. उद्धव ठाकरे-शरद पवारांना टिकायचे राजकारण करायचे आहे त्यामुळे टिकायच्या राजकारणात तुम्ही २ गोष्टींवर टिकता. मतदान जास्त हवे किंवा खासदार जास्त हवे. उद्धव ठाकरेंना स्पर्धक एकनाथ शिंदे आहेत. शरद पवारांना स्पर्धक अजित पवार आहेत. ज्याचे कुणाचे खासदार जास्त येतील तो टिकणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा त्यांनी विचार करायला हव्या. कमी लढून जास्त जागा जिंकणं हे महत्त्वाचे आहे असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विरोधातही युती आहे. त्या युतीत अजित पवार किमान ८ जागा, एकनाथ शिंदे १४ जागा आणि भाजपा २६ जागा लढेल अशी परिस्थिती आहे. आम्ही महाविकास आघाडीला १२-१२ जागांचा फॉर्म्युला दिला. आमची ताकद आहे. शिवसेनेकडे १८ जागा होत्या, त्याठिकाणी निवडून येऊ शकत नाही म्हणून तुम्ही समझोता करताय. समझौता म्हणजे आत्मसर्मपण होत नाही. आमच्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा पडल्या असा आरोप केला जातो.पण ज्यावेळी तुम्ही पक्ष म्हणून असाल तेव्हा निवडणूक लढणे हा मुख्य अजेंडा असतो. जर तुम्ही पडणार असाल तर निवडणुका लढवूच नका. तुम्ही भानगडीत कशाला पडताय? असं त्यांनी म्हटलं.
तसेच आम्ही उद्धव ठाकरेंना सरळ सांगितलंय, तुम्ही पर्याय निवडा. त्यात आम्ही २४-२४ जागा लढवू असा प्रस्ताव मी दिलाय. आता उद्धव ठाकरेंना ठरवायचे आहे. आम्हाला इंडिया आघाडीत घेतले नाही तर तुम्ही आमच्यासोबत राहणार की इंडिया आघाडीत जाणार हे ठरवावे. आम्ही दोघे एकत्र लढलो तर ३० जागांपेक्षा कमी येणार नाही. आम्हाला इंडिया आघाडीत घेऊन जायचे की आमच्यासोबत लढायचे हे उद्धव ठाकरेंना निवडावे लागेल. जर आम्ही इंडिया आघाडीत नाही गेलो तर आम्ही स्वतंत्र लढणार. मग उद्धव ठाकरेंना सगळ्यांना सोबत घ्यायचे असेल तर त्यांनी आम्हाला इंडिया आघाडीत घ्यावे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. पत्रकार प्रशांत कदम यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, मागील निवडणुकीत काँग्रेसला १ जागा मिळाली.तीदेखील शिवसेनेतून आलेल्या माणसाला मिळाली. शरद पवारांकडे ४ जागा आहेत.शिवसेनेने भाजपासोबत लढताना १८ जागा आल्या. आता हीच ताकद राहिलीय का? जर ही ताकद राहिली असेल तर या पक्षांनी समझोता केला नसता. शिवसेनेचे १८ खासदार आले त्यात भाजपाचीही मते होती. आता तुम्ही नवीन पार्टनर शोधले. महायुतीत जागावाटप ठरलं मग महाविकास आघाडीत जागावाटप का होत नाही असंही आंबेडकर यांनी विचारले.
चोराच्या उलट्या बोंबा
आम्ही युतीत न येण्यासाठी जास्त जागांची मागणी करतोय असा जे आरोप करतात, मागच्या निवडणुकीत किती ठिकाणी हरले हा हिशोब काढला तर ४० ठिकाणी हरले आहेत. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तसं आहे. स्वत:ला काय करायचे नाही. तुमच्याकडे किती मते याचा विचार करा. स्वबळावर निवडून येऊ शकत नाही म्हणून युती होते. तुमची ताकद निवडून येण्याची नाही. वास्तव चित्र पाहिले पाहिजे. तुमची ताकद नाही म्हणून समझोता करून निवडून येण्याचा प्रयत्न करता. त्या प्रयत्नात तुम्ही सगळ्यांना समान भागीदार म्हणून वागवले पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.