लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - मुंबईसह राज्यातील पाच महापालिका क्षेत्रात मागील तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेली अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यात दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एटीकेटीत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रक्रियेतून प्रवेश दिले जाणार आहेत.शिक्षण संचालनालयाने गणपतीच्या सुटीनंतर मंगळवारी सहाव्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली.
विशेष प्रवेश फेरीत अर्ज केलेल्या दोन हजार ६९६ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यातील ५४५ विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेतले आहेत. या फेरीसाठी मुंबई विभागात एकूण ९२ हजार ७०२ जागा उपलब्ध होत्या. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मागील दोन वर्षांच्या प्रवेश स्थितीचा आढावा घेऊन आणखी एका विशेष फेरीचे नियोजन करण्याचा विचार माध्यमिक शिक्षण संचालनालय करीत असल्याने ही प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वीपासून अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक व भाग दोन भरुन ठेवला आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २४ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेले नाही. तर आता नव्याने २ हजार ७०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.