Join us

तुम्ही या मुलीला पाहिले का? वरळी सी फेसवर गोणीतील ‘त्या’ मृतदेहाचा चेहरा तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 7:56 AM

वरळी कोळीवाडा येथील आयएनएस त्राता तळाच्या मागच्या बाजूला ४ जुलै रोजी निर्जन परिसरात गोणीमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  वरळी सी फेसवर गोणीमध्ये आढळून आलेल्या मुलीच्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी फेस रिकन्स्ट्रक्शन करण्यात आले आहे. त्याच्या आधारे पोलिस मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. या मृत व्यक्तीबद्दल माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 

वरळी कोळीवाडा येथील आयएनएस त्राता तळाच्या मागच्या बाजूला ४ जुलै रोजी निर्जन परिसरात गोणीमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ८ ते १० दिवस मृतदेह समुद्रात असल्यामुळे तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. चेहऱ्याचे मास, केस पूर्णपणे गळून गेल्याने फक्त दोन ते तीन दात शिल्लक होते. या मृत मुलीची ओळख पटविण्यापासून ते तिच्या हत्येचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी तपास करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी तीन पथके तयार करून मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई अशा ठिकाणांहून बेपत्ता झालेल्या मुलींची माहिती गोळा करत तपास सुरू आहे.

फॉरेन्सिक विभागाच्या मदतीने तरुणीच्या चेहऱ्याशी साधर्म्य साधणारा चेहरा तयार करण्यात आला आहे. याचे छायाचित्र सर्व पोलिस ठाण्यासह सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहे.  या मुलीबाबत माहिती देणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस जारी करण्यात आले आहे. पोलिस ठाण्याकडून संबंधितांचे मोबाइल क्रमांकही शेअर करण्यात आले आहेत. या मुलीबाबत काही माहिती असल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन  पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

ती मुलगी अल्पवयीन असल्याचा अंदाज मुलीच्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी फेस रिकन्स्ट्रक्शन करण्यात आले आहे. फॉरेन्सिकनुसार, ही मुलगी १५ ते १७ वर्षीय असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.