-डॉ. राजेश गवांदे (आयएफएस)
रविवारची मुलाखत वसाकाठी पाच हजार पासपोर्ट जारी करणारे मुंबईचे प्रादेशिक पारपत्र कार्यालय हे देशातील आणि प्रमुख कार्यालय आहे. किंबहुना, मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील विदेश भवन इमारत ही केवळ प्रादेशिक पारपत्र कार्यालयाचीच इमारत नव्हे तर, परराष्ट्र मंत्रालयाची देशातील एक महत्त्वाची वास्तू आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित कार्यालये महाराष्ट्रात विविध ठिकाणी विखुरलेली होती. मात्र, ते चित्र बदलत केंद्र सरकारने ही सर्व कार्यालये, विभाग मुंबईतील विदेश भवन या एकाच इमारतीमध्ये वसवली आहेत. देशातील या प्रमुख कार्यालयाची धुरा सध्या डॉ. राजेश गवांदे (आयएफएस) यांच्या खांद्यावर आहे. त्यांची मनाेज गडनीस यांनी घेतलेली विशेष मुलाखत.
पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो, तर काय काळजी घ्यावी ?
पासपोर्ट विभागाची स्वतःची वेबसाइट आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागातून तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. परंतु, अलीकडच्या काळात अनेकांनी पासपोर्टसाठी अर्ज करा किंवा पासपोर्ट काढा, अशा बनावट वेबसाइट सुरू केल्या आहेत. त्यावेबसाइटदेखील विभागाच्या वेबसाइटसारख्याच हुबेहूब बनवलेल्या आहेत. त्यामुळे अशा वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज भरू नये किंवा त्यावर पैसे देखील भरू नयेत. या वेबसाइट निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्काची आकारणी करतात तसेच अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमची पासपोर्टसाठीची अपॉइंटमेंट झाल्याचे देखील सांगतात. पण ते सत्य नाही. ती फसवणूक आहे. अशी फसवणूक झालेले अनेक लोक आमच्या कार्यालयात येतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज भरणा करावा. त्या पासपोर्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच अर्जदारांनी अर्ज भरावा.
पासपोर्टचे काही प्रकार आहेत का?ढोबळमानाने आपण दोन प्रकार म्हणू शकतो. एक सामान्य पासपोर्ट आणि दुसरा तत्काळ श्रेणीत मिळणारा पासपोर्ट. सामान्य श्रेणीतील पासपोर्टसाठी १,५०० रुपयांचे शुल्क आकारले जाते तर तत्काळसाठी २००० व १,५०० असे एकूण ३,५०० रुपयांचे शुल्क आकारले जाते.पोलिस पडताळणी हा एक मुख्य टप्पा आहे, त्याबद्दल काय सांगाल ? पहिल्यांदाच जर कुणी पासपोर्ट काढत असेल तर पासपोर्ट काढणाऱ्या व्यक्तीची पोलीस पडताळणी झाल्यानंतर त्याचा पासपोर्ट जारी होतो. जर पासपोर्टचे नुतनीकरण असेल तर अशावेळी त्याने अर्ज केल्यानंतर त्याला पासपोर्ट मिळतो आणि त्यानंतर त्याची पोलिस पडताळणी होते. जर एखाद्या व्यक्तीला आधी पासपोर्ट मिळाला असेल आणि पोलिस पडताळणीमध्ये त्या व्यक्तीवर गुन्हा असल्याची माहिती मिळाली तर आम्ही त्या व्यक्तीला नोटीस जारी करतो. त्या नोटिशीद्वारे संबंधित व्यक्तीला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर योग्यतेनुसार किंवा गरज भासल्यास त्या व्यक्तीचा पासपोर्ट निलंबितदेखील केला जातो. ६ वर्षांच्या आतील मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची पोलीस पडताळणी होत नाही.काही लोकांचा कामयस्वरूपी पत्ता हा वेगळा असतो आणि ते कामासाठी दुसऱ्या शहरात असतात, अशावेळी कोणता पत्ता त्यांनी द्यायला हवा? तुमचा कायमस्वरूपी पत्ता कोणताही असो, पण तुम्ही तुमच्या सध्याच्या वास्तव्याचा पत्ता देणे अनिवार्य आहे. कारण तुमच्या सध्याच्या वास्तव्याच्या पत्त्यावरच पोलिस पडताळणी होते. पासपोर्टचा अर्ज भरतेवेळी कायमचा आणि तात्पुरता असे दोन्ही पत्ते द्यावे लागतात. तुमच्या पडताळणीवेळी पोलीस जेव्हा तुमच्या घरी येतात तेव्हा अर्जदार त्या पोलिसांना स्वतः भेटणे बंधनकारक आहे. त्यानंतर ती पडताळणी पूर्ण होते आणि त्याचा अहवाल आमच्याकडे येतो. त्यानंतरच त्या पासपोर्टची वैधता प्रक्रिया पूर्ण होते.
पासपोर्ट काढण्यासाठी किती वेळ लागतो? नियमानुसार ३० ते ४५ दिवसांत सामान्य पासपोर्ट मिळतो तर तत्काळ पासपोर्ट ३ दिवसांत मिळतो. कोविड काळामध्ये कामकाज थंडावल्यामुळे देशभरात १ कोटी पासपोर्ट जारी करण्याचा बॅकलॉग आहे, तर चालू वर्षातील १ कोटी पासपोर्ट जारी करण्याचे काम सुरू आहे. लोकांना पासपोर्ट जलदगतीने मिळावा, याकरिता डिसेंबरमध्ये आम्ही १० डिसेंबर, १७ डिसेंबर व २४ डिसेंबर या तिन्ही शनिवारी काम करत आहोत. तीन डिसेंबरच्या शनिवारी देखील पासपोर्ट कार्यालय खुले होते. शक्य तितक्या वेगाने पासपोर्ट जारी करण्याचे काम सुरू आहे.