Join us

तुम्ही मतदार नोंदणी केली का? अधिकारी घरी येऊन नावांची करणार पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 2:32 PM

मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ‘घरोघरी अधिकारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, २१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत.

मुंबई : लोकशाही बळकट करण्यात निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुधारणा केल्या आहेत. निवडणूक पारदर्शकपणे घेण्यासोबत आता सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. 

मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ‘घरोघरी अधिकारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, २१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत.

अधिकारी काय करणार? - मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांचा वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करणार आहेत.- मृत आणि स्थलांतरित मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेणार आहेत.- मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया, यासोबतच नवमतदार, तृतीयपंथी आणि विमुक्त जाती- भटक्या जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची आणि मतदार यादीत नाव नसलेल्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

पुरावा काय लागणार? - मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणीपट्टी, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार यापैकी एक- वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, राज्य शिक्षण मंडळाने दिलेले दहावी, बारावीचे प्रमाणपत्र यापैकी एका पुराव्याची आवश्यकता आहे.

नागरिकांनी काय करावे? - आपल्या घरी अधिकारी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे.- वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत; पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी.- मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत.- लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावे बदलून घ्यावीत.- स्थलांतरित झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी.

मतदार नोंदणीची शिबिरे तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काउट यांच्या सहकार्याने मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. मतदार नोंदणी, नाव वगळणे, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https:// voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

टॅग्स :मुंबई