हवीहवीशी... ‘प्यार की झप्पी’, ‘मिठीतल्या गोडव्या’साठी तरुणाई आतुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:43 AM2018-02-12T01:43:32+5:302018-02-12T01:43:53+5:30
प्रेमाच्या आठवड्याच्या सप्तरंगी रंगात मुंबापुरी सध्या न्हाऊन निघत आहे. सर्वत्र या ‘व्हॅलेंटाइन्स वीक’चे ‘गुलाबी सेलिब्रेशन’ सुरू आहे. त्यातलाच सहावा दिवस म्हणजे ‘हग डे’.
मुंबई : प्रेमाच्या आठवड्याच्या सप्तरंगी रंगात मुंबापुरी सध्या न्हाऊन निघत आहे. सर्वत्र या ‘व्हॅलेंटाइन्स वीक’चे ‘गुलाबी सेलिब्रेशन’ सुरू आहे. त्यातलाच सहावा दिवस म्हणजे ‘हग डे’. आलिंगन, बाहुपाश असे सुंदर शब्द असलेल्या मिठीला इंग्रजीत ‘हग’ हा प्रतिशब्द असल्यामुळे या दिवसाला ‘हग डे’ म्हणून संबोधले जाते. आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारून शुभेच्छा देण्याचे प्रयोजन यानिमित्ताने साधले जाते. आपल्या मनात ‘त्या’ प्रिय व्यक्तीबद्दल असलेले प्रेम, विश्वास, आपुलकी, काळजी व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यामुळे हा खास हग डे साजरा करण्यासाठी मुंबईकर तरुणाई सज्ज आहे. ती हवीहवीशी वाटणारी मिठी त्याला/तिला मारण्यासाठी ती/तो आतुरलेले आहेत.
ते दोघेही त्याच्या/तिच्या त्या हळुवार स्पर्शाची वाट पाहत असतात, तो दिवस आज उजाडणार आहे; परंतु अफाट गर्दी असलेल्या मुंबई शहरात ही मिठी मारणे शक्य होत नाही. त्यासाठी हवी असलेली प्रायव्हसी, स्पेस मिळणे शक्य होत नाही. आणि तरीही एखाद्या ठिकाणी मिठी मारण्याचा प्रयत्न झालाच तर आपला ‘सो कॉल्ड’ समाज त्यांच्याकडे वाईट आणि कुत्सित नजरेने पाहतो. तेव्हा त्या युगुलालाही ओशाळल्यासारखे वाटते. त्यातही काही जोडपी या गोष्टी साध्य करतात. ही जोडपी दादरचे शिवाजी पार्क, मरिन ड्राइव्ह, वांद्र्याचे बँड स्टँड, जुहू चौपाटी, पवई लेक, मढ, गोराई आणि अक्सा बीच यांसारख्या ठिकाणी जाऊन मिठीची इच्छा पूर्ण करतात.
हल्ली कामातून वेळ न मिळणे, कामाच्या व्यापातून सुट्टी न मिळणे, दोघांचीही घरे - कार्यालये एकमेकांपासून लांब असणे यामुळे कित्येक जोडप्यांना भेटणे शक्य होत नाही. अशा वेळी सोशल मीडियाचा वापर करून शुभेच्छा देणे, तिच्यासाठी कविता किंवा किमान चारोळी लिहून पाठवून अनेक जण हा गुलाबी दिवस साजरा करतात.
याउलट परिस्थिती असते ती कॉलेजियन्सची. कॉलेजमध्ये शिकणाºया युगुलांना भेटण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. रोज भेटता येते. कॉलेजच्या उद्यानात, मैदानात, जिमखाना, लायब्ररी, कॉरिडोरमध्ये हवीहवीशी मिठीची इच्छा पूर्ण करता येते. त्यामुळे ‘हग डे’ यांच्यासाठी फारच खास असतो.