मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब; सर्वंकष चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:06 AM2021-03-27T04:06:22+5:302021-03-27T04:06:22+5:30
महापाैर पेडणेकर; सर्वंकष चौकशीचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून, याबाबत ...
महापाैर पेडणेकर; सर्वंकष चौकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून, याबाबत सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित सनराईज रुग्णालयाला २८ फेब्रुवारी २०२१ला बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ३१ मार्च २०२१पर्यंत रुग्णालय बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्यानंतर कोविडची रुग्णसंख्या वाढल्याने हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले होते. दरम्यान, आग ही मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागल्यानंतर ती जोमाने वाढून वर कोविड सेंटरपर्यंत जाऊन पसरली. त्यातून ही दुर्घटना घडली असून, याठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली होती का? याबाबत बैठक घेण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
भांडुपच्या ड्रीम्स मॉल आगप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी सांगितले की, आगीची घटना समजल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री याठिकाणी भेट देऊन मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयाबाबत विचारणा केली. संबंधित कोविड रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये तत्काळ हलविण्याचे निर्देश दिले. यापूर्वी मुंबईत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व ठिकाणचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश अग्निशमन दलासोबत घेतलेल्या बैठकीत दिले आहेत. सर्व कोविड सेंटरमधील फायर ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत. या आगीचा दोन दिवसात संपूर्ण अहवाल आल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे.