दोन्ही पाय गमावल्याने ४० वर्षे घरी बसावे लागले, मोफत शिकवून शेकडो विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे केले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 03:31 PM2020-06-21T15:31:30+5:302020-06-21T16:34:44+5:30
संकटांवर मात करून जीवनात यशस्वी ठरलेली अगदी मोजकीच लोकं आपल्या आसपास दिसतात. अशाच दृढनिश्चयी व्यक्तींपैकी एक म्हणजे राजीव पोद्दार होय.
मुंबई - तुमचे इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मोठ्यातले मोठे संकटही तुमच्यासमोर हार मानते. अशा संकटांवर मात करून जीवनात यशस्वी ठरलेली अगदी मोजकीच लोकं आपल्या आसपास दिसतात. अशाच दृढनिश्चयी व्यक्तींपैकी एक म्हणजे राजीव पोद्दार होय. लहानपणी आलेल्या आजारपणामुळे दोन्ही पाय लुळे झाल्याने घरापुरतेच जीवन मर्यादित झालेल्या राजीव यांनी या संकटावर मात करत जीवनात यशस्वी होऊन दाखवले. तसेच ज्ञानदानाचे कार्य करत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनातही ज्ञानदीप उजळवत त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. त्याचीच ही गोष्ट.
राजीव पोद्दार यांना वयाच्या नवव्या वर्षी पॅरलॅसिसमुळे दोन्ही पाय गमवावे लागले. या आघातामुळे राजीव यांचे जीवन व्हिलचेअरपुरते मर्यादित झाले आणि चार भिंतींचे घर हेच त्यांच्यासाठी जग बंद झाले. आजारपण आणि आई-वडिलांची आर्थिक कुवत नसल्याने त्यांचे नियमित शिक्षणही थांबले. येथूनच राजीव पोद्दार यांच्या ४० वर्षांच्या होम क्वारेंटाइनला आणि संघर्षाला सुरुवात झाली. राजीव यांच्या संघर्षाची ही गोष्ट ह्युमन ऑफ बाँबेने आपल्या फेसबूक पेजवर शेअर केली आहे.
त्यात राजीव सांगतात, आजारपणामुळे मी शाळेला जाऊ शकत नव्हतो. तसेच मी माझ्या मित्रांनाही भेटू शकत नव्हतो. काही मोजकेच मित्र मला भेटण्यासाठी येत. माझ्यामुळे माझ्या कुटुंबालाही खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच आहे. माझ्यावरील उपचार हे खर्चिक आहेत. त्यामुळे माझ्या कुटुंबाला पैशांची चणचण भासू शकते, हे मला माहीत होते. त्यामुळे मी स्वत:च संघर्ष करण्यास सुरुवात केली.
त्या काळात मी मित्रांकडून पुस्तके मागवून ती मी वाचत असे. मात्र माझे मित्र शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करतील, मात्र मला काहीच करता येणार नाही, असा विचार करून मी दु:खी होत असे. मात्र जेव्हा मी घरी येत असे तेव्हा मला माझ्या जीवनाचा उद्देश मिळे. २३ वर्षांच्या वयापर्यंत मी विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन केले होते. माझ्या आजूबाजूच्या लोकांना माझ्या बौद्धिक क्षमतेची कल्पना होती. तेव्हा त्यांनी माझ्याकडे त्यांच्या मुलांच्या शिकवण्या घेण्याबाबत विचारले. मग मी मुलांना गणित शिकवण्यास सुरुवात केली, असे राजीव यांनी सांगितले.
मी मुलांना कधीही गणित शिकवले नव्हते. मात्र मला हा विषय शिकवताना मजा येऊ लागली. मी गमतीदार पद्धतीने गणित शिकवण्यास सुरुवात केली. मुलांनाही माझी ही शिकवण्याची पद्धत खूप आवडू लागली. अनेक मुलांनी तर आपल्या शिवकणीतील शिक्षकांना नकार देऊन माझ्याकडे शिकवण्याची विनंती केली, असेही राजीव यांनी अभिमानाने सांगितले. दरम्यान, राजीव पोद्दार हे अल्पावधीतच कोलकातामधील प्रसिद्ध शिक्षक बनले. त्यांच्याकडील विद्यार्थ्यांची बॅच १० वरून वाढून १०० पर्यंत पोहोचली. मात्र राजीव यांनी या मुलांना शिकवण्यासाठी कधी पैसे घेतले नाहीत. विद्यादानाला त्यांनी कधी उदरनिर्वाहाचे साधन बनवले नाही. तर ट्रेडिंग स्टॉकच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईमधून ते उदरनिर्वाह चालवतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या