अतिवृष्टीचा कहर; पुन्हा तुंबापुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:08 PM2020-08-04T17:08:02+5:302020-08-04T17:08:34+5:30
कुलाबा २५२.२ मिमी; सांताक्रूझ २६८.६ मिमी
मुंबई : सोमवारी रात्री ७ वाजल्यापासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आपला कहर कायम ठेवला. विशेषत: सोमवारी मध्यरात्री आणि मंगळवारी पहाटे मुंबईसह आसपासच्या परिसराला झोडपलेल्या पावसामुळे मुंबई आणि लगतची शहरे ठप्प झाली होती. मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवली येथे दरड कोसळून झालेल्या अपघात सुदैवाने हानी झाली नसली तरी दिवसभर हा मार्ग ठप्प झाला होता. या व्यतीरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गासह लाल बहादूर शास्त्री मार्गावर ठिकठिकाणी सखल भागात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रहदारी ठप्प पडली होती. तर काही ठिकाणी रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. या व्यतीरिक्त रेल्वे मार्गही ठप्प झाले होते. एकंदर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे सकाळी मुंबईत पुर सदृश्य निर्माण झाली होती.
दादर येथील हिंदमाता आणि माटुंगा येथील गांधी मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे कंबरे एवढे पाणी साचले होते. परिणामी हा मार्ग पुर्णत: ठप्प होता. लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, कल्पना सिनेमागृह, शीतल सिग्नल आणि कमानी सिग्नल येथे पाणी साचल्याने रस्ते वाहतूक काही प्रमाणात ठप्प तर काही प्रमाणात धीम्या गतीने सुरु होती. या व्यतीरिक्त पश्चिम रेल्वे मार्गावरील चारही लाईनवरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. हार्बर मार्गावर कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. तर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. एकंदर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच कोसळलेल्या पावसाने मुंबईला वेठीस धरले असून, पुढील २४ तासही धोक्याचे असल्याने मुंबईकरांनी घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
-------------------
येथे साचले पाणी
हिंदमाता, सक्कर पंचायत चौक, दादर टीटी, एसआयईएस कॉलेज, गोल देऊळ, जे जे जंक्शन, ठाकुरद्वार नाका, शेखर मिस्री दर्गा रोड, भेंडी बाजार जंक्शन, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, चुनाभट्टी बंटर भवन, मानखुर्द रेल्वे स्थानक, टिळक नगर, अंधेरी सबवे, दहिसर सबवे, खार सबवे, मालाड सबवे, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज.
-------------------
बेस्टची वाहतूक वळविली
हिंदमाता, प्रतिक्षा नगर, चेंबूर येथील शेल कॉलनी, वांद्रे टॉकीज, गोरेगाव येथील शास्त्री नगर, दहिसर सबवे, अंधेरी मार्केट येथील एस.व्ही रोड, ओशिवरा पूल येथील अजित ग्लास, खोदादाद सर्कल, कुर्ला येथील शीतल तलाव आणि बैलबाजार, विद्याविहार स्थानक, ओबेरॉय मॉल, मालाड सबवे, आर्शिवाद हॉटेल, भाऊ दाजी रोड, मरोळ येथील गौतम नगर, बामन दया पाडा, मुलुंड एलबीएस नगर, गोल देऊळ, भेंडीबाजार, परळ ब्रीज, मालवणी येथील म्हाडा कॉलनी, अॅन्टॉप हिल सेक्टर, संगम नगर, मराठा कॉलनी येथे बेस्ट बसची वाहतुक वळविण्यात आली होती.
-------------------
पाऊस आणि घटना
- मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे महापालिकेने केले.
- कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीच्या लगत राहत असलेल्या क्रांतीनगरमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणात्सव जवळल्या शाळेत स्थलांतरित केले जात होते.
- समुद्राला मोठी भरती असल्याने समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते.
- लाल बहादूर शास्त्री मार्गावर सखल भागात साचलेले पावसाचे पाणी लगतच्या दुकानांत शिरले होते.
- वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.
- गोराई गावठाण येथे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
- दहिसर नदीला पूर आला होता. दौलत नगरमध्ये पाणी साचेल होते.
- सायन रेल्वे स्थानकात पाणी साचले होते.
- मांटुगा पोलिस ठाण्यात पाणी शिरले होते.
- बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगतच्या रस्त्याला नद्यांचे स्वरूप आले होते.
- भांडुप, मुलूंड येथील सखल भागात पाणी साचेल होते.
-------------------
कुठे पडला किती पाऊस (मिमी)
वरळी ४१
धारावी ३७
दादर ३३
मुलुंड ७१
विक्रोळी ५४
चेंबुर ४१
कुर्ला ३४
गोरेगाव ८२
चिंचोली ७५
अंधेरी ७४
मरोळ ७१
कांदिवली ६७
दहिसर ६४
बोरीवली ६३
-------------------