मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लॉकडाऊन पुन्हा लावण्यात आला आहे. मात्र वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. ध्वनिप्रदूषण कमी झाले नाही. मागच्या लॉकडाऊनमध्ये वाहतूक कमी होती. ध्वनिप्रदूषण कमी होते. मात्र या लॉकडाऊनमध्ये असे काहीच दिसत नाही. गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. वाहतुकीची कोंडी वाढत आहे. ध्वनिप्रदूषणाने तर कहर केला आहे. त्याची पातळी ८८ डेसिबलवर गेली आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आल्याची माहिती सुमेरा अब्दुलअली यांनी डॉक्टर संघटनेने आंतरराष्ट्रीय ध्वनी जनजागृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये दिली.
ताण, हृदयविकार, मानसिक ताण या समस्या वाढतच राहतात. मात्र डॉक्टरांनी या विषयावर सातत्याने बोलायला हवे. यापुढे जात यात स्थानिक स्तरावर अधिकाधिक संशोधन होणे गरजेचे आहे; कारण आजही ध्वनिप्रदूषण हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. आपण आरोग्यावर बोलायला हवे. गेल्या ३० वर्षांत ध्वनिप्रदूषणाबाबत म्हणावे तसे काम झाले नाही. सरकारसोबत काम झाले पाहिजे. लोकांसोबत काम झाले पाहिजे. डॉक्टर शिबिरे घेतात. जनजागृती करतात, ही चांगली गोष्ट आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय अभ्यास झाला पाहिजे. आपल्याकडे वैद्यकीय अभ्यास होत नाही. आपण प्रत्येक वेळी जागतिक आरोग्य संघटनेचे दाखले देतो. त्यांचे संशोधन पाहतो. मात्र आपण आपल्या स्थानिक स्तरावर संशोधन केले पाहिजे. ज्याप्रमाणे नेत्रशिबिरे होतात, त्याप्रमाणे ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी शिबिरे झाली पाहिजेत. अन्यथा आपण कायमचे बहिरे होऊ, अशी भीतीदेखील सुमेरा अब्दुलअली यांनी व्यक्त केली.