मुंबई : मुंबईतपार्किंग प्रश्न बिकट होत असताना पार्किंगचे दर आकारण्यासाठी पालिकेचे निश्चित दर असतानाही अनेकदा जास्तीची रक्कम वसूल केली जाते. शिवाय याच्या तक्रारी करण्यासाठी पालिकेकडे सक्षम ऑनलाइन यंत्रणा ही अस्तित्वात नाही. या पार्श्वभूमीवर पार्किंगची नियमाप्रमाणे दर आकारणी होण्यासाठी आणि अतिरिक्त वसुलीवर नियंत्रण आणण्यासाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करावी, असे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सुचविले आहे. अर्थसंकल्पासाठी आपल्या सूचना आणि शिफारशी करताना त्यांनी ही सूचना पालिका प्रशासनाला केली असून, यामुळे पार्किंग माफियावर नियंत्रण आणण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
फास्टॅगला जोडावे
मुंबईच्या पे आनंद पार्कमध्ये जादा शुल्क वसुलीच्या घटना सर्रास घडतात; मात्र त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. एखाद्या कंत्रादाराला नोटीस बजावून हा प्रश्न सुटणार नसल्याचे नार्वेकर यांनी म्हटले. त्यामुळे मुंबईकरांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी पालिकेने अशा पार्किंग लॉटमध्ये पार्किंग शुल्क वसूल करण्यासाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू केली पाहिजे. ही डिजिटल पेमेंट प्रणाली फास्टॅगसोबत जोडून पारदर्शकपणे शुल्क आकारणी केली पाहिजे, असे नार्वेकर यांनी सुचविले आहे.