रेल्वेही आणणार फेरीवाला धोरण
By admin | Published: January 15, 2016 02:01 AM2016-01-15T02:01:03+5:302016-01-15T02:01:03+5:30
रेल्वे स्थानक आणि हद्दीत फेरीवाल्यांकडून अडवली जाणारी जागा, त्यातच प्रवाशांना होणारा त्रास, कारवाई करूनही फेरीवाल्यांकडून पुन्हा त्याच जागेत केला जाणारा प्रवेश
- सुशांत मोरे, मुंबई
रेल्वे स्थानक आणि हद्दीत फेरीवाल्यांकडून अडवली जाणारी जागा, त्यातच प्रवाशांना होणारा त्रास, कारवाई करूनही फेरीवाल्यांकडून पुन्हा त्याच जागेत केला जाणारा प्रवेश पाहता, यावर तोडगा काढण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून फेरीवाला धोरण आणण्यात येत असून, त्यासाठी हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर, ट्रेनमधून प्रवास करताना, स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा विळखा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यातून वाट काढताना प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. रेल्वे सुरक्षा दलाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करूनही पुन्हा जैसे थेच परिस्थिती दिसून येते. एकूणच फेरीवाल्यांकडून निर्माण केला जाणारा अडथळा आणि प्रवासी संघटनांकडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची केली जाणारी मागणी पाहता, रेल्वेकडून यावर तोडगा काढण्यात येत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रेल्वे मंत्रालयाने फेरीवाला धोरण आखण्याचा निर्णय घेतला आहे. यातून फेरीवाल्यांनाही न्याय
मिळेल आणि प्रवाशांनाही मनस्ताप होणार नसल्याचे सांगण्यात
आले. यासाठी रेल्वे मंत्रालयाने या विषयांशी संबंधितांकडून हरकती व सूचना मागितल्या आहेत. hawkerpolicy2016@gmail.com वर या हरकती ३१ मार्च २0१६ पर्यंत पाठविण्यात याव्यात, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
या हरकती व सूचना आल्यानंतर धोरण आखण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. भारतीय रेल्वे स्थानक, हद्दीत आणि ट्रेनमध्ये आरपीएफने केलेल्या कारवाईत गेल्या वर्षात १ लाख ७३ हजारांपेक्षा जास्त अनधिकृत फेरीवाले अडकल्याची नोंद आहे.
रेल्वे प्रशासनाला मनस्ताप
सध्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानक आणि लोकलमध्ये फेरीवाल्यांचा मोठा मनस्ताप रेल्वे प्रशासनाला होत आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई करूनही पुन्हा फेरीवाले आपले बस्तान बसवतात. महत्त्वाची बाब म्हणजे, हे धोरण आखताना अनधिकृत फेरीवाल्यांना स्थानक हद्दीत संधी उपलब्ध केल्यास प्रवाशांना त्याचा अडथळा आणखी वाढेल, असे रेल्वे पोलिसांतील सूत्रांकडून सांगितले.
पश्चिम रेल्वे मार्गावर २0१५ मध्ये 11635 केसेस अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध झाल्या आहेत. यात २५ जणांना जेलची हवा खावी लागली.
मध्य रेल्वे मार्गावर जवळपास 17000 फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यात २५६ जणांना जेलची हवा खावी लागली.