विक्रोळी- मुंबईत पुन्हा एकदा मनसे नेत्यावर हल्ला झाला आहे. विक्रोळीमध्ये विश्वजीत ढोलम आणि विनोद शिंदे यांच्यावर रविवारी फेरीवाल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मनसेचे उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळेंच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेवाळेंच्या कवटीला फ्रॅक्चर झालं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणीसंदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथं गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि यांच्यावर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली.
विश्वजीत ढोलम यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. विश्वजीत ढोलम यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे जाब विचारायला गेले होते. तेव्हा फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना अजून मारहाण झाली. या मारहाणीत शिंदे आणि उपेंद्र शेवाळे हे जखमी झाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे मालाडमधले नेते सुशांत माळवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.
मनसेच्या विभाग अध्यक्षांची कृष्णकुंजवर तातडीची बैठक
पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना पाहता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. मनसेच्या मुंबईतील सर्व विभाग अध्यक्षांना राज ठाकरेंनी ‘कृष्णकुंज’वर बोलावून घेतले आहे. विक्रोळीत मनसे पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची विभाग अध्यक्षांसोबतची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज ठाकरे या हल्ल्यांबाबत काय भूमिका घेतात आणि पुढील वाटचाल काय ठरवतात, हे या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’वर बैठक आयोजित करण्यात आली आहे.