फेरीवाले पुन्हा आले!, एका दिवसाच्या कारवाईनंतर पुन्हा बस्तान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:43 AM2017-10-23T05:43:49+5:302017-10-23T05:43:57+5:30
मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकालगतच्या फेरीवाल्यांवर कारवाई केली असली, तरी प्रत्यक्षात रविवारी पुन्हा दादर, कुर्ला, घाटकोपर आणि अंधेरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाले निदर्शनास आले.
मुंबई : मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकालगतच्या फेरीवाल्यांवर कारवाई केली असली, तरी प्रत्यक्षात रविवारी पुन्हा दादर, कुर्ला, घाटकोपर आणि अंधेरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाले निदर्शनास आले. महत्त्वाचे म्हणजे, महापालिका आणि रेल्वे सजग असताना, शनिवारी यापैकी कोणत्याच ठिकाणी फेरीवाले आढळले नव्हते, परंतु रविवार उजाडताच पुन्हा फेरीवाले निदर्शनास आल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ निष्पाप जिवांचा बळी गेला आणि प्रशासन खडबडून जागे झाले. शिवाय मनसेनेही रेल्वे स्थानकाच्या परिसरासह पुलावरील फेरीवाल्यांबाबत प्रशासनाला १५ दिवसांचा इशारा दिला. मनसेचा इशारा संपतो, तोवर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने कारवाई करत ठिकठिकाणचे फेरीवाले हटविले. त्यानंतर रविवारी सकाळीच विविध रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांना मनसैनिकांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली. ठाणे, कल्याण, वसई, घाटकोपर रेल्वे स्थानकांवर फेरीवाल्यांना हुसकावून लावत त्यांचे सामान रस्त्यावर
फेकून पुन्हा ठेले न लावण्याची तंबीही मनसे कार्यकर्त्यांनी दिली. कारवाई शिथिल होताच पुन्हा ठिकठिकाणी फेरीवाले निदर्शनास आले. यात प्रामुख्याने दादर, कुर्ला, घाटकोपर आणि अंधेरी रेल्वे स्थानक परिसरांचा समावेश आहे.
>मनसेला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा-निरुपम
रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छुपा पाठिंबा आहे. त्या जोरावरच मनसैनिकांनी फेरीवाल्यांना मारहाण करत कायदा हातात घेतल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी रविवारी केला.पंधरा दिवसांपूर्वी संताप मोर्चात बोलताना राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावणार असल्याचे म्हटले होते. राज यांनी जाहीर भाषणात दिलेल्या या धमकीला गांभीर्याने घेत त्यावर कारवाई करणे गरजेचे होते. परंतु राज्य सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे आज मनसे कार्यकर्ते जेव्हा तोडफोड आणि मारहाण करत होते तेव्हा पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा दावा निरुपम यांनी केला.मनसेने या आंदोलनाच्या नावाखाली फक्त गरीब आणि परप्रांतीय फेरीवाल्यांना लक्ष्य केले आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचा अधिकार मनसेला कुणी दिला, असा सवालही निरुपम यांनी केला. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा अधिकार रेल्वे, महापालिका आणि प्रशासनाला आहे. मनसेला तो हक्क नाही, असेही निरुपम म्हणाले.