फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढलेलेच

By admin | Published: May 1, 2017 06:59 AM2017-05-01T06:59:21+5:302017-05-01T06:59:21+5:30

स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यात ठाणे महापालिका सपशेल अपयशी ठरल्याने सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, वारानुसार कारवाईसाठी

The hawkers have developed | फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढलेलेच

फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढलेलेच

Next

ठाणे : स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यात ठाणे महापालिका सपशेल अपयशी ठरल्याने सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, वारानुसार कारवाईसाठी उपायुक्तांची नेमणूक अशा सगळ्या योजना फसल्यानंतर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर फेरीवाल्यांवर ठेवली जाणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी जानेवारी महिन्यात केली होती. परंतु, त्यासंदर्भात विद्युत विभागाला अद्याप माहितीच नसल्याची बाब समोर आली आहे.
दुसरीकडे स्टेशन परिसर ते जांभळीनाका या परिसरात सकाळी पाच वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत फेरीवाल्यांचे साम्राज्य असून यामुळे येथून ये-जा करणाऱ्या टीएमटी बसलादेखील २ मिनिटांच्या कालावधीसाठी यामुळे अर्ध्या तासाचा अवधी लागत आहे. त्यात होणाऱ्या किरकोळ अपघातांचे खापर मात्र टीएमटीचालकांवरच फोडण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
महापालिकेने धाडसी मोहीम राबवून स्टेशन परिसरातील कोंडी फोडून येथील रस्त्याचे रुंदीकरण केले. त्यानंतर येथील फेरीवाल्यांवरदेखील कारवाई केली. विशेष म्हणजे या ठिकाणी परिवहन सेवेच्या बससह इतर वाहनांचीदेखील वाहतूक सुरू केली. परंतु, या भागातून फेरीवाल्यांचे प्रस्थ अद्यापही हटू शकलेले नाही. स्थानिक व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात पालिकेला यश आलेले नाही.
सुरुवातीला या फेरीवाल्यांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हींची संकल्पना मांडण्यात आली होती. स्थानिक व वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या एका संयुक्त पथकाची घोषणाही मध्यंतरी झाली होती. त्यानंतरही अतिक्र मणांचा विळखा कायम असल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना वार ठरवून या भागातील फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, कोणताही अधिकारी नेमून दिलेल्या दिवशी या भागात फिरकत नसल्याचे स्पष्ट झाले होते. पालिकेची पथके या भागात कारवाईसाठी तैनात असली तरी ते कारवाईसाठी येणार असल्याची खबर व्हॉटसअ‍ॅपवरून किंवा कोड भाषेद्वारे फेरीवाल्यांना दिली जाते आणि काही वेळासाठी ते या भागातून गायब होतात अशी तक्रार आहे. एका तासातून एक वेळा सध्या येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेची गाडी फिरत आहे. परंतु, आधीच माहिती मिळत असल्याने कारवाईचा फज्जा उडत आहे.
कारवाईच्या वेळी फेरीवाले पळून जात असतील तर त्यावर ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. याला आता चार महिन्यांचा अवधी उलटून गेला आहे. परंतु, ते बसवलेच नाहीत. विशेष म्हणजे यासंदर्भात पालिकेच्या विद्युत विभागाला छेडले असता, अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारची पावलेच उचलली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या लपवाछपवीच्या खेळाचा फटका ठाणे परिवहन सेवेच्या चालकांसह, प्रवाशांनादेखील बसू लागल्याचे दिसत आहे. पहाटे पाच वाजल्यापासून येथे फेरीवाले बसत असल्याने टीएमटीच्या बसचा वेग येथे येऊन मंदावत आहे. त्यात सकाळी १० ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत या भागात फेरीवाल्यांकडे विविध वस्तू घेण्यासाठी गर्दी झालेली असते. त्यामुळे हा मार्ग संपूर्णपणे चिंचोळा होत आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी परिवहनच्या चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मागील महिनाभरात येथे अनेक किरकोळ अपघात झाले असून त्याचा नाहक त्रास चालकांना सहन करावा लागला आहे. काहींनी तर परिवहन चालकांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. एकूणच यामुळे येथून मार्ग काढण्यासाठी २ मिनटांऐवजी अर्धा तास जात असल्याने, सॅटीसवर प्रवासीदेखील ताटकळत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The hawkers have developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.