गटारात भाजी लपविणारे फेरीवाले अडचणीत; फौजदारी कारवाईची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 05:05 AM2018-02-11T05:05:55+5:302018-02-11T05:06:04+5:30
महापालिकेच्या कारवाईतून वाचण्यासाठी ‘भाजीपाला’ गटारात लपविणे वाकोला येथील ‘त्या’ फेरीवाल्यांना चांगलेच महागात पडणार आहे. मुंबईकरांची अशा प्रकारे फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशी खेळ करणाºया या फेरीवाल्यांवर फौजदारी कारवाईही होण्याची शक्यता आहे.
मुंबई : महापालिकेच्या कारवाईतून वाचण्यासाठी ‘भाजीपाला’ गटारात लपविणे वाकोला येथील ‘त्या’ फेरीवाल्यांना चांगलेच महागात पडणार आहे. मुंबईकरांची अशा प्रकारे फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशी खेळ करणाºया या फेरीवाल्यांवर फौजदारी कारवाईही होण्याची शक्यता आहे.
एल्फिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत फेरीवाल्यांचे सामान जप्त करून ते नष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी पालिकेचे पथक येताच फेरीवाले आपले सामान लपवित आहेत. मात्र, वाकोला येथील नेहरू रोडवरील फेरीवाल्यांनी आपल्याकडील भाजीपाला चक्क तेथील गटारात लपविल्याची धक्कादायक बाब उघड झाली.
असे चित्रण असलेला व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर पालिकेने नेहरू रोड येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामानही जप्त केले आहे. वांद्रे पश्चिम येथील साहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी ही कारवाई केली.
मात्र, एवढ्यावरच ही कारवाई थांबणार नसून ‘त्या’ फेरीवाल्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केल्याचे समजते.
काय आहे व्हिडीओत..?
कारवाईनंतर पालिकेचे पथक तेथून निघून गेल्यानंतर फेरीवाले रस्त्यावरच असलेल्या पर्जन्य जलवाहिनींवरील झाकणे काढून त्या गटारात लपवून ठेवलेली भाजी व फळे बाहेर काढताना दिसत आहे.
नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांचे पती व माजी नगरसेवक ब्रायन मिरांडा हे स्वत: या घटनेचे साक्षीदार आहेत.