Join us

फेरीवाल्यांवरून राजकारण तापले, निरूपम यांच्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:57 AM

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, जिथे फेरीवाले मजबूत असतील तिथे मनसेला मार खावाच लागेल, अशी आक्रमक भाषा संजय निरूपम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, जिथे फेरीवाले मजबूत असतील तिथे मनसेला मार खावाच लागेल, अशी आक्रमक भाषा संजय निरूपम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. प्रक्षोभक भाषणाबद्दल निरूपम यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. तर फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मनसेचे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदिवलीच्या आॅस्कर रुग्णालयात भेट घेत मनसेच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला. त्याच वेळी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी या प्रश्नावर मनसेला पाठिंबा देत निरूपम यांच्यावर शरसंधान केले. या सर्व प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईत उमटले असून, मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशीस्थानक परिसरात फेरीवाल्यांवर हल्ला केला. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात मनसेचे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे शनिवारी गंभीर जखमी झाल्यानंतर रविवारी या प्रश्नावरील राजकारण आणखी तापले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदिवलीच्या आॅस्कर रुग्णालयात जाऊन माळवदेंची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज यांचे पुत्र अमित ठाकरेही उपस्थित होते. स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांविरोधात मनसेने मोहीम हाती घेतली आहे.जखमी माळवदे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. मनसे पदाधिकाºयावर झालेला हल्ला, संजय निरूपम यांची आक्रमक भाषा आदी पार्श्वभूमीवर राज यांनी रविवारी कोणतेच भाष्य केले नाही. राज यांनी मौन बाळगले असले, तरी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी या वादात उडी घेतली आहे.मराठी माणसावरील हल्ला खपवून घेणार नसल्याचा इशारा देत राणे यांनी मनसेला पाठिंबा दिला आहे. नितेश राणे यांनीही रविवारी माळवदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संजय निरूपम यांच्यावर टीका केली.