दादरमध्ये स्वच्छता मोहिमेसाठी फेरीवाल्यांनीच घेतला पुढाकार; प्लाझा परिसर ‘चकाचक’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:25 AM2024-01-03T10:25:14+5:302024-01-03T10:26:08+5:30
भाजी विक्रेतेही आले मदतीला.
मुंबई : दादरमधील प्लाझा चित्रपटगृहाबाहेरील परिसरात प्रचंड वर्दळ, फेरीवाल्यांनी व्यापलेले रस्ते, भाजी विक्रेत्यांचा कलकलाट आणि भाजीच्या कचऱ्यामुळे दिवसभर चिखलमय होणारा रस्ता हे चित्र पाहायला मिळते. हेच चित्र बदलण्याचा निर्धार पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाने केला आहे. प्लाझा परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. विशेष म्हणजे या मोहिमेत फेरीवाले, भाजीवाले देखील सहभागी झाले होते. एरवी हेच फेरीवाले पालिका अधिकाऱ्यांच्या रडारवर असायचे. मात्र, या स्वच्छता मोहिमेसाठी पालिका अधिकारी-फेरीवाल्यांचे ‘मनोमिलन’ झाल्याचे पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मुंबईत विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहे. दादर स्थानक परिसर भाजी आणि फूल विक्रेत्यांसाठी मोठा बाजार आहे. दररोज पहाटे या ठिकाणी मुंबई बाहेरून मोठ्या प्रमाणावर घाऊक प्रमाणावर भाजी आणि फुले आणली जातात. लहान व्यापारी ते विकत घेतात आणि ठिकठिकाणी नेऊन विकतात. यामुळे त्याचा ताण दादर परिसरावर येऊ लागला आहे.
स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्यामुळे त्यांनाही आपण किती कचरा करतो याची जाणीव झाली. भाजी उतरवताना ताडपत्री ठेवावी, गोणी अंथरावी. त्यामुळे रस्त्यावर चिखल होणार नाही, अशी सूचना भाजी व्यावसायिकांना करण्यात आली आहे - इरफान काझी, घनकचरा व्यवस्थापन विभाग, जी उत्तर.
अशी झाली साफसफाई :
भाज्यांच्या गोण्या उतरविताना पडणाऱ्या भाज्या, माती यामुळे स्थानकाजवळचे रस्ते विशेषतः प्लाझा येथे टिळक पुलावरील पदपथावर चिखलाचे जाड थर साचतात. यावरून अनेकदा घसरून पडण्याचा धोकाही पादचाऱ्यांना असतो. या परिसरातील कचऱ्याचे प्रमाण प्रचंड आहे. ते कमी करण्यासाठी फेरीवाले, भाजी विक्रेते यांच्यात जनजागृती करण्याची गरज होती. यावेळी कनिष्ठ पर्यवेक्षक सुनील मकवाना, मुकादम सुनील कांबळे आणि स्वच्छतादूतही सहभागी झाले होते. यावेळी ब्रशच्या साहाय्याने रस्ते घासून, मग पाण्याच्या फवाऱ्याने रस्ता धुण्यात आला. यंत्रसामग्रीच्या साहाय्याने ही साफसफाई करण्यात आली.