हॉक्स कॉल्सची डोकेदुखी
By admin | Published: January 26, 2016 02:17 AM2016-01-26T02:17:38+5:302016-01-26T02:17:38+5:30
‘इसिस’च्या हालचाली आणि केंद्रीय तपास यंत्रणा व एटीएसने केलेल्या अटकसत्रामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे
मनीषा म्हात्रे, मुंबई
‘इसिस’च्या हालचाली आणि केंद्रीय तपास यंत्रणा व एटीएसने केलेल्या अटकसत्रामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. २५ जानेवारीपर्यंत १० ‘हॉक्स कॉल्स’ (अफवा आणि धमक्यांचे कॉल्स) आल्याने मुंबई पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली. अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईत दर महिन्याला १५ ते २० ‘हॉक्स कॉल्स’ येतात. पोलीस शहानिशा करतात, तरीही नागरिकांनी सदैव जागरूक राहून तपासात सहकार्य करणे गरजेचे असल्याचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले.
घातपात होणार असल्याचा कॉल आल्यावर तत्काळ कारवाई करण्याशिवाय पोलिसांकडे पर्याय नसतो. अनेकदा या अफवा असतात. अल्पवयीन मुलेही अशा प्रकारचे कॉल्स करतात. आठ वर्षांत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ८ लाख ६५ हजार ६७२ कॉल्स आले आहेत. ६० ते ७० टक्के कॉल्स निनावी होते. तर त्यात २० टक्के कॉल्स ‘हॉक्स कॉल्स’ होते. निव्वळ मजा म्हणून असे कॉल्स केले जातात.
चित्रपटातील, वृत्तवाहिन्यांवरील हिंसक दृश्ये आणि घटनांचे आकर्षण वाटल्यामुळे लहान मुले धमकीचे कॉल्स करतात. पालकांनी मुलांशी संवाद साधल्यास या घटना कमी होतील, असे आॅपरेशन विभागाचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले.‘कॉल्स’ची डोकेदुखी
या हेल्पलाइनवर घरगुती भांडणाबरोबर इथे रस्ता खणला आहे, पाणी साचले, वाहतूककोंडी झाली आहे, अशा प्रकारचे कॉल्सही येतात. त्यापैकी ५० टक्के कॉल्स हे फक्त रिसिव्ह केल्यावर कट केले जातात. बऱ्याचदा काही टवाळखोर मंडळी कॉल करून महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील भाषेत बोलतात. अशा पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्षात ८० ते ९० पोलिसांची टीम कार्यरत आहे. आॅपरेशन विभागाचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या नियंत्रणाखाली या हेल्पलाइनचे काम सुरू आहे. नुकतेच कर्मचाऱ्यांना हेडफोन्स देण्यात आले. त्यामुळे मिनिटा-मिनिटाला खणखणणारे कॉल हाताळण्यास मदत होत आहे.
नियंत्रण कक्षात एखादा कॉल आल्यास त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन याची माहिती एसीपी कंट्रोलला दिली जाते. त्यानंतर एसीपीमार्फत पोलीस उपायुक्त आणि पोलीस उपायुक्तांकडून ही माहिती आयुक्तांना दिली जाते. त्यानंतर एसीपी कंट्रोलद्वारे स्थानिक पोलीस ठाण्यासह, बॉम्ब शोधक पथक, एटीएस यांना सूचित केले जाते. पोलिसांबरोबरच नागरिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे. नियंत्रण कक्षात येणाऱ्या प्रत्येक कॉलची शेवटपर्यंत तपासणी केली जाते. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणांच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे नागरिकांनीही याचे गांभीर्य लक्षात घेऊन माहिती पुरविणे गरजेचे आहे.
- अहमद जावेद,
पोलीस आयुक्त मुंबई