मुंबई : हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने महावितरणने राज्यातील ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले. यातील आठ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या कारवाईमुळे मीटर रीडिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये घट झाली असून महसुलात वाढ झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.
दोन कोटी १५ लाख लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग कंत्राट पद्धतीच्या एजन्सीजद्वारे करण्यात येते. एजन्सीजने काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे, हे प्रकार आढळून येत आहे. संबंधित रीडिंग एजन्सीच्या कामामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु हयगय कायम राहिल्यास एजन्सीजविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
कोणत्या परिमंडलातील किती एजन्सीजवर कारवाई...नांदेड १०जळगाव ८अकोला ७,लातूर, कल्याण, बारामती व नाशिक प्रत्येकी ४औरंगाबाद २पुणे, चंद्रपूर, कोकण व अमरावती या परिमंडलातील प्रत्येकी १
महसुलात १४० कोटींची वाढ गेल्या एक महिन्यात वीज विक्रीमध्ये १९९ दशलक्ष युनिटने म्हणजेच १४० कोटी रुपयांनी महावितरणच्या महसुलात वाढ झाली आहे.
अचूक मीटर रीडिंगसाठी फेब्रुवारीपासून उपाययोजना लघुदाब उपाययोजनांना सुरुवात वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी फेब्रुवारीपासून उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. १०० टक्के अचूक मीटर रीडिंग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांना आढळून आले. या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली होती.