संदीप नाईकांसाठी धोक्याचा अलार्म
By admin | Published: April 25, 2015 04:45 AM2015-04-25T04:45:36+5:302015-04-25T04:45:36+5:30
विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही निवडून आलेले ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्यासाठी ही निवडणूक धोक्याचा इशारा देणारी ठरली आहे.
नारायण जाधव, नवी मुंबई
विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही निवडून आलेले ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्यासाठी ही निवडणूक धोक्याचा इशारा देणारी ठरली आहे. येथील ५९ नगरसेवकांपैकी सुमारे २८ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. त्यातील ऐरोलीतील १३ नगरसेवकांसह घणसोली-कोपरखैरणे या माथाडी कामगारबहुल परिसरातील अनेक नगरसेवकांचा समावेश आहे. तर काँगे्रसचे तीन आणि भाजपाचे दोन नगरसेवक याच मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभेत साडेसात हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या नाईक यांची धाकधूक वाढविली आहे.
विधानसभेत पराभूत होऊनही शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांनी आपले ऐरोलीवरील वर्चस्व या निवडणुकीत कायम ठेवले आहे. याशिवाय विधानसभेत नाईक यांच्यासोबत असलेले एम. के. मढवी, विनया मढवी हे नगरसेवक आता शिवसेनेच्या तंबूत गेले आहेत. तसेच ऐरोलीतील राष्ट्रवादीचा चेहरा असलेले अनंत सुतार यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. त्यापाठोपाठ घणसोलीतील प्रशांत पाटील, कमल पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. तर घणसोलीतून संजय पाटील व कोपरखैरणेतही केशव म्हात्रेंचा पराभव झाला आहे. तसेच शिवराम पाटील, अनिता पाटील हे दाम्पत्य शिवसेनेत गेले आहे. यामुळे ऐरोलीत शिवसेनेची ताकद वाढली आहे.
शिवाय राष्ट्रवादीचा हक्काचा मतदार असलेल्या माथाडी कामगारांनी महापालिका निवडणुकीत मात्र शिवसेनेला साथ दिली आहे. तात्या तेली, घणसोलीत संजय पाटील, छाया पाटील आणि माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या सख्ख्या भाचीचा झालेला पराभव याचे त्यासाठी उदाहरण देता येईल. शिंदेंनी जंगजंग पछाडूनही त्यांच्या भाचीचा झालेला पराभव बरेच काही सांगून गेला आहे. यामुळे आमदार संदीप नाईक यांच्यासह माथाडी नेत्यांनीही या निवडणुकीतून बोध घेऊन नव्याने मोर्चेबांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.