मुंबई : हिमालयात असाधारण बर्फवृष्टी सुरू असून, बर्फवृष्टीदरम्यान होणाऱ्या हिमस्खलनात भारतीय जवान शहीद होत आहेत. मुळात हिमस्खलनाची ही धोक्याची घंटा असून, आपण वेळेतच सावध होत पर्यावरण संवर्धनासाठी तत्परतेने पावले उचलली पाहिजेत. अन्यथा पृथ्वीचा विनाश होईल, अशी भीती भारतीय पर्यावरण चळवळीचे निमंत्रक आणि पर्यावरणतज्ज्ञ अॅड. गिरीश राऊत यांनी वर्तवली.हिमालयात होत असलेल्या हिमस्खलनांच्या पार्श्वभूमीवर गिरीश राऊत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या महिन्याभरात उत्तर गोलार्धात युरोपातही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली. ग्रीस, रूमानिया इत्यादी देशांत तापमान ३० अंशापेक्षा खाली गेले. या वेळी विषृववृत्तावर श्रीलंकेत आतापर्यंतचा ऐतिहासिक दुष्काळ सुरू आहे. दक्षिण गोलार्धात आॅस्ट्रेलियात काही ठिकाणी अधिक ४० अंशापेक्षा तापमान नोंदवण्यात येत आहे. पश्चिम अंटार्क्टिकावरील सुमारे पाच हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचा व सुमारे १ हजार फूट उंचीचा (जाडीचा) प्रचंड हिमखंड मूळ भागापासून सुटला आहे. तो प्रशांत महासागरात शिरत आहे. त्यामुळे त्याच्या आतील भागातील हिमनद्या वेगाने वितळणार आहेत.सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे १८ जानेवारी रोजी जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, सन २०१६ हे तापमानाचा उच्चांक करणारे सलग १६वे वर्ष ठरले आहे. जागतिक तापमानवाढीचा दुष्परिणाम असून, यामुळे या घटना होत आहेत. वातावरणातील बदल दिवसागणिक अधिक गंभीर रूप घेत आहेत. डिसेंबर २०१६ हा वाढत्या तापमानाचा सलग २०वा महिना ठरला आहे. जानेवारी १९८५पासून डिसेंबर २०१६पर्यंतच्या सर्व ३७२ महिन्यांतील उच्चतम तापमान हे विसाव्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा जास्त होते. नोव्हेंबर २०१६मधील उच्चतम तापमान २०व्या शतकाच्या सरासरी तापमानापेक्षा ०.९४ अंशाने जास्त होते. २०व्या शतकातील सरासरी तापमानात शेवटच्या तीन दशकांतील वाढलेल्या तापमानाचा मोठा वाटा होता; आणि आता २१व्या शतकातील फक्त १६व्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील उच्चतम तापमान यात जवळजवळ १ अंशाचे अंतर असून, तापमानवाढीचा हा वेग सुन्न करणारा आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
हिमस्खलन ही धोक्याची घंटा
By admin | Published: February 06, 2017 3:43 AM