Join us

डोंगर उतारावरील झोपड्यांना धोक्याचा इशारा

By admin | Published: May 05, 2016 2:12 AM

पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच पूर्व उपनगरांतील डोंगर उतारावर वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने संबंधितांना

मुंबई : पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच पूर्व उपनगरांतील डोंगर उतारावर वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने संबंधितांना केले आहे. पावसाळ्यात दरड कोसळून डोंगर उतारावरील ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी होते. हे टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने मे महिन्यातच डोंगर उतारावरील रहिवाशांना धोक्याचा इशारा दिला आहे.एम/पूर्व विभागातील दिनक्वारी मार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका येथील ओम गणेशनगर, राहुलनगर, नागाबाबानगर, सह्याद्रीनगर, अशोकनगर, भारतनगर, बंजारतांडा, हशू अडवाणीनगर व एल. यू. गडकरी मार्ग येथील विष्णूनगर या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना महापालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात जोरदार सरींमुळे दरडी कोसळण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे डोंगर उतारावरील रहिवाशांना करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)- स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर राहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना, जीवित अथवा वित्तहानी झाल्यास महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे म्हणत पालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे.