Join us

गणेश नाईकांना दिलासा; बलात्काराच्या आरोपात हायकोर्टाचा अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 12:11 PM

नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या एका महिलेने त्यांच्याविरोधात बेलापूर आणि नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 

मुंबई – भाजपा नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर नाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी गणेश नाईकांनी हायकोर्टाकडे अटकपूर्व जामीनाचा अर्ज केला होता. त्याला हायकोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे गणेश नाईकांना अटकेपासून संरक्षण मिळणार आहे. अलीकडेच या प्रकरणात नाईक यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज ठाणे येथील कोर्टाने फेटाळला होता.

नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या एका महिलेने त्यांच्याविरोधात बेलापूर आणि नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.  नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तब्बल २७ वर्षांनी बलात्काराचा आरोप केला होता. याबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच रिव्हॉल्व्हर दाखवून धमकाविल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेने स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. गणेश नाईक यांनी अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवल्याचे या महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांनी या प्रकऱणात तपास करण्यास सुरुवात केली असून, या महिलेची वैद्यकीय चाचणी केली होती.

काय आहे प्रकरण?

१९९३ पासून पीडिता आणि नाईक यांचे संबंध होते. २००४ ला अपत्य झाले. परंतु, गेल्या दोन वर्षांपूर्वी नाईक यांनी राजकीय पक्ष बदलला. त्यामुळे त्यांच्यावर हे आरोप होत आहेत, असा दावा नाईक यांच्या वकिलांनी केला. मात्र, राजकीय पक्षांशी या आरोपांचा संबंध नसून, तब्बल २७ वर्षे पीडितेने अन्याय सहन केल्याचे तिच्या वकिलांनी न्यायालयात तसेच प्रसार माध्यमांना सांगितले. दरम्यान, दोन वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर नाईक हे भूमिगत झाले होते. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस म्हणाले.

टॅग्स :गणेश नाईकउच्च न्यायालयभाजपा