मुंबई : कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट निष्क्रिय करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ९ मार्च रोजी सुनावणी घेऊ, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. कंगनाने अलीकडेच ट्विटरवरून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ‘देशद्रोही’ म्हटले आहे. त्यामुळे आपल्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला केली. व्यवसायाने वकील असलेले याचिकाकर्ते अली खाशिफ खान देशमुख यांनी मंगळवारी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे त्यांनी डिसेंबरमध्ये कंगनाचे ट्विटर अकाउंट निष्क्रिय करण्याबाबत केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, यासाठी अर्ज केला. आपल्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे कारण देताना देशमुख यांनी अर्जात म्हटले आहे की, कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना कंगनाने ‘दहशतवादी’ म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने आपण या याचिकेवर ९ मार्च रोजीच सुनावणी घेऊ शकतो, असे म्हटले. कंगना दोन भिन्न धर्मांच्या समाजांमध्ये द्वेष निर्माण करीत आहे, असे देशमुख यांनी याचिकेत म्हटले आहे. मात्र, राज्य सरकारने या याचिकेला विरोध केला आहे. गेल्या आठवड्यात ट्विटर इंडियाने कंगनाच्या दोन पोस्ट प्लॅटफॉर्मवरून हटविल्या. त्या पोस्टमुळे हिंसाचार होऊ शकतो, असे ट्विटरचे म्हणणे होते. आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहाना हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केल्यावर कंगना ट्विटरवर सक्रिय झाली. ती शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात ट्विटरवर पोस्ट करीत आहे. ५ फेब्रुवारी रोजी दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिसांना या प्रकरणी तपास अहवाल सदर करण्याचे निर्देश दिले आहेत.शेतकऱ्यांना संबाेधले दहशतवादी! दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना कंगनाने ‘दहशतवादी’ म्हटले. याविराेधात कंगनाचे ट्विटर अकाउंट निष्क्रिय करण्यात यावे यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
कंगनाचे ट्विटर अकाउंट; ९ मार्चला हाेणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 4:58 AM